राज्यातील एकशिक्षकी शाळांमध्ये ७४ टक्क्यांची घट
‘युडीआयएसई’चा अहवाल : ६वी ते १२वीपर्यंतच्या विद्यार्थी नोंदणीत गोवा अव्वल
Story: पिनाक कल्लोळी। गोवन वार्ता |
28th August, 10:43 pm

🏫
📉 गोव्यात एक शिक्षकी शाळांमध्ये ७४% घट
•
पणजी : राज्यातील एक शिक्षकी शाळांच्या संख्येत तब्बल ७४ टक्क्यांनी घट झाली आहे. २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात राज्यात २३८ एक शिक्षकी शाळा होत्या, तर २०२४-२५ मध्ये ही संख्या ६२ वर आली आहे. केंद्रीय शिक्षण खात्याच्या ‘युनिफाइड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन प्लस’च्या (युडीआयएसई) गुरुवारी जारी झालेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
वर्ष २०२४-२५ च्या अहवालानुसार, गोव्यात एकूण १४७९ शाळा असून, त्यामध्ये ३ लाख ५४६ विद्यार्थी आणि १५ हजार १९६ शिक्षक आहेत. राज्यातील विद्यार्थी-शिक्षक प्रमाण २०:१ इतके आहे. प्रत्येक शाळेत सरासरी १० शिक्षक आणि २०३ विद्यार्थी आहेत.
📈
सकल नोंदणी गुणोत्तर
देशात सर्वाधिक
या अहवालानुसार, गोव्यातील सहावी ते बारावीपर्यंतचे सकल नोंदणी गुणोत्तर देशात सर्वाधिक आहे.
राज्यातील केवळ २१.३ टक्के सरकारी शाळांमध्येच संगणकाद्वारे शिक्षण देण्यासाठी आवश्यक असलेले चालू स्थितीतील संगणक उपलब्ध आहेत. याउलट, अनुदानित शाळांमध्ये हे प्रमाण ९४.३ टक्के, तर खाजगी शाळांमध्ये ९३.६ टक्के आहे.
अहवालानुसार, २०२४-२५ मध्ये गोव्यात शून्य प्रवेश असणारी एकही शाळा नव्हती. तिसरी ते आठवी दरम्यान शाळा सोडण्याचे प्रमाण ०.४ ते ०.८ टक्के इतके कमी होते. मात्र, नववी ते बारावी दरम्यान शाळा सोडण्याचा दर ८.१ टक्के होता. यामध्ये मुलांचे प्रमाण १०.९ टक्के, तर मुलींचे प्रमाण ५.१ टक्के होते.
एक शिक्षकी शाळा
२०२३-२४: २३८
२०२४-२५: ६२
घट: ७४%
सरकारी शाळा
२०२३-२४: ७८९
२०२४-२५: ७८०
९ शाळा बंद
विद्यार्थी-शिक्षक
२०:१
गुणोत्तर
📚
शाळा सोडण्याचा दर तुलना
देशभरात पश्चिम बंगालमध्ये शाळा सोडण्याचा दर सर्वाधिक (२०.३ टक्के) राहिला. गोव्यात नववी ते बारावी दरम्यान शाळा सोडण्याचा दर ८.१ टक्के होता, ज्यामध्ये मुलांचे प्रमाण १०.९ टक्के, तर मुलींचे प्रमाण ५.१ टक्के होते.
#Goa #Education #Schools #UDISE #SingleTeacherSchools #DropoutRate #Panaji