विजेच्या झटक्याने भावांचा मृत्यू प्रकरणी एका महिलेला अटक

वन्य प्राण्यांपासून शेतीच्या रक्षणासाठी कुंपण घातल्याचे स्पष्ट


29th August, 11:24 pm
विजेच्या झटक्याने भावांचा मृत्यू प्रकरणी एका महिलेला अटक

प्रतिनिधी। गोवन वार्ता
केपे : शिवसुरे रिवण येथे गणेश चतुर्थीच्या दिवशी दोघा सख्ख्या भावांचा शेतात टाकलेल्या विजेच्या तारेला स्पर्श होऊन जागीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी केपे पोलिसांनी शिवसुरे येथील जया बापू गावकर (६४) या महिलेला अटक केली आहे.
गणेश चतुर्थीच्या दिवशी सायंकाळी शिड्डे पांडवसडा येथील राजेंद्र काशिनाथ गावकर (४६) व त्यांचा धाकटा भाऊ मोहनदास (४०) हे गुरांना चारा आणण्यासाठी माळ रानात गेले होते. चारा घेऊन येताना विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने दोघांचाही मृत्यू झाला होता. ही विजेची तार वन्य प्राण्यांनी शेताची नासधूस करू नये म्हणून जया गावकर यांनी घातली होती, असे पोलीस चौकशीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जया गावकर हिला अटक करण्यात आली.
रात्री उशिरापर्यंत दोघे भाऊ घरी न परतल्याने ग्रामस्थांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. ग्रामस्थांना गावकर बंधूंची रिक्षा माळरानावर नजरेस पडली. लोकांनी काही अंतरावर जाऊन पाहिले असता दोघेही निपचित पडल्याचे दिसले. याबाबत माहिती मिळताच केपे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून तपास सुरू केला. लोकांच्या जीवाला धोका निर्माण केल्याप्रकरणी केपे पोलिसांनी जया गावकर हिच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता १०५ कालमाखाली गुन्हा नोंद करून तिला अटक केली.
वीज तारांच्या कुंपणाशी स्पर्श झाल्याने मृत्यू
वीज तारांच्या कुंपणाशी राजेंद्र व मोहनदास गावकर यांचा संपर्क आल्याने विजेचा धक्का बसून त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा विद्युत वाहिनीच्या तारांशी संबंध नाही, असे वीज खात्याने स्पष्ट केले आहे.
दोघा भावांच्या मृत्यूची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मृतांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करीन.
_ सुभाष फळदेसाई, स्थानिक आमदार तथा समाजकल्याण मंत्री

हेही वाचा