पडझड सुरूच : राज्यात सरासरी ११२.८० इंच पाऊस
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : मागील दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील सांगे आणि धारबांदोडा केंद्रात पाऊस दीड शतकाच्या जवळ येऊन पोहोचला आहे. १ जून ते ३० ऑगस्ट दरम्यान सांगेमध्ये १४८.७० इंच, तर धारबांदोडामध्ये १४८.०५ इंच पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी सकाळी राज्यात जोरदार पाऊस होता; मात्र दुपारनंतर पावसाने उघडीप दिली. काही ठिकाणी किरकोळ पावसाची नोंद झाली. राज्यात पडझडीच्या घटना मात्र सुरूच होत्या.
राज्यात २४ तासात सरासरी १.८१ इंच पावसाची नोंद झाली. यादरम्यान सांगेमध्ये २.८५ इंच, केपेमध्ये २.३६ इंच, पणजीत २.२३ इंच पावसाची नोंद झाली. हवामान खात्याने ३१ ऑगस्ट रोजी दक्षिण गोव्यासाठी पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. १ ते ५ सप्टेंबर दरम्यान संपूर्ण गोव्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. यानुसार या पाच दिवसांसाठी पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.
शनिवारी पणजीत कमाल ३०.४ अंश, तर किमान २४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुरगावमधील कमाल तापमान २६.८ अंश व किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहिले. पुढील सहा दिवस राज्यातील कमाल तापमान ३० ते ३१ अंश, तर किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. राज्यात १ जून ते ३० ऑगस्ट दरम्यान सरासरी ११२.८० इंच पावसाची नोंद झाली. यंदा पावसाचे प्रमाण ७.३ टक्क्यांनी अधिक आहे.
राज्यात १ मेपासून १३९.६ इंच पाऊस
राज्यात १ ते ३१ मे दरम्यान सरासरी २६.८ इंच पावसाची नोंद झाली. १ मे ते ३० ऑगस्ट दरम्यान सरासरी १३९.६ इंच पावसाची नोंद झाली आहे.