शेजारील घराचे नुकसान : भिवशेट यांच्या समाजकार्याचे कौतुक
गावसावाडा, म्हापसा येथे पडिक घराची कोसळलेल्या भिंतीची पाहणी करताना उपनगराध्यक्ष प्रकाश भिवशेट.
...
प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा : गावासावाडा, म्हापसा येथील एका पडिक घराची भिंत कोसळून शेजारील प्रसाद केरकर यांच्या घराचे नुकसान झाले. ही घटना शनिवारी दुपारी १२.३० च्या सुमारास घडली. केरकर यांच्या घराशेजारी विनावापर असलेलेल्या जुन्या घराची भिंत त्यांच्या घराच्या दर्शनी भागावर पडली. यामुळे घराच्या व्हरांड्यावरील कौलारू छताची मोडतोड झाली. या दुर्घटनेत केरकर यांचे सुमारे ५० हजारांचे नुकसान झाले.
घटनेची माहिती मिळताच म्हापसा अग्निशमन दलाचे जवान व उपनगराध्यक्ष प्रकाश भिवशेट यांनी घटनास्थळी धाव घेतली. सायंकाळी उपनगराध्यक्ष भिवशेट यांनी स्वत: कामगारांची व्यवस्था करून धोकादायक स्थितीत असलेली शिल्लक घराची भिंत पाडली. याबद्दल उपजिल्हाधिकारी व मामलेदारांनी भिवशेट यांचे कौतुक केले.
उपनगराध्यक्ष भिवशेट यांनी सांगितले की, गेल्या वर्षी या पडिक घराचा अर्धा भाग पालिकेने पाडला होता. केरकर कुटुंबाने शिल्लक भाग कोसळण्याच्या स्थितीत असल्याची कल्पना दिली होती. त्यानुसार पालिकेतर्फे पाहणी करून अहवाल उपजिल्हाधिकाऱ्यांना पाठवून अतिक्रमण हटाव पथकाच्या साहाय्याने हे घर जमिनदोस्त करण्याची विनंती केली होती. मात्र गणेश चतुर्थीच्या सुटीमुळे या कामाला विलंब झाला. सतंतधार पावसामुळे भिंत कोसळली.
प्रसाद केरकर यांच्या घराच्या व्हरांड्याच्या छताचे नुकसान झाले. सदर भिंत जीर्ण झाली असून कोसळण्याच्या स्थितीत असलेली ती भिंत संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पाडण्यात येणार आहे, असेही भिवशेट यांनी स्पष्ट केले.