जुलै २०२५ अखेरीस प्रतिव्यक्ती २ लाख ६० हजार १८० रुपये गुंतवणूक
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : मागील तीन महिन्यांत गोव्यातून होणाऱ्या म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीत वाढ होत आहे. जून २०२५ अखेरपर्यंत गोव्यातून म्युच्युअल फंडमध्ये ३९ हजार ९०० कोटी रुपये गुंतवण्यात आले होते. जुलै २०२५ अखेरीस त्यात ७०० कोटी रुपयांची वाढ होऊन ती ४० हजार ६०० कोटी रुपये झाली आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंडस् इन इंडिया (एएमएफआय) संस्थेने जारी केलेल्या अहवालातून ही माहिती मिळाली आहे.
अहवालानुसार, जुलै महिन्यात गोव्यातील म्युच्युअल फंडमधील प्रतिव्यक्ती गुंतवणूकदेखील वाढली आहे. जून २०२५ अखेरीस गोव्यात प्रतिव्यक्ती २ लाख ५६ हजार १७० रुपये म्युच्युअल फंडमध्ये गुंतवण्यात आले होते. जुलै २०२५ अखेरीस त्यात वाढ होऊन ती प्रतिव्यक्ती २ लाख ६० हजार १८० रुपये झाली. गोव्यातील प्रतिव्यक्ती गुंतवणूक ही देशात सर्वाधिक आहे. या यादीत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी आहे. येथून प्रतिव्यक्ती २ लाख ५१ हजार ५१० रुपये म्युच्युअल फंडमध्ये गुंतवले आहेत. केंद्र शासित प्रदेशांत दिल्लीतील प्रतिव्यक्ती गुंतवणूक ३ लाख ५ हजार ८८० रुपये आहे.
अहवालानुसार, जुलै २०२५ अखेरपर्यंतच्या आकडेवारीनुसार गोव्यातील एकूण गुंतवणुकीपैकी सर्वाधिक २९ हजार ८९२ कोटी रुपये ग्रोथ, इक्विटी स्कीममध्ये गुंतवण्यात आले आहेत. ४ हजार ७०१ कोटी रुपये डेबिट ओरिएंटेड स्कीममध्ये, १,६७४ कोटी लिक्विड स्कीममध्ये गुंतवले आहेत. संपूर्ण देशाचा विचार करता जुलै २०२५ अखेरीस म्युच्युअल फंडमध्ये सुमारे ७७ लाख कोटी रुपये गुंतवण्यात आले आहेत.
एकूण ३२.८ टक्के महिला गुंतवणूकदार
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएससी) अहवालानुसार, जुलै २०२५ अखेरीस राज्यातील एकूण गुंतवणूकदारांपैकी ३२.८ गुंवणूकदार महिला होत्या. महिला गुंतवणूकदारांची राष्ट्रीय सरासरी २४.६ टक्के होती. गोव्यातील २.६० लाख लोकांनी शेअर बाजारात गुंतवणूक केली आहे. जुलै महिन्यात गोव्यातील ३ हजार लोकांनी प्रथमच शेअर बाजारात गुंतवणूक केली आहे.