कणकुंबी-जांबोटी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास प्रारंभ

‘गोवन वार्ता’च्या वृत्ताची दखल : प्रवाशांत समाधान


30th August, 11:44 pm
कणकुंबी-जांबोटी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास प्रारंभ

चोर्ला-जांबोटी मार्गावरील दुरुस्तीच्या कामात व्यस्त असलेले कामगार. (लुईस रॉड्रिग्ज)
प्रतिनिधी। गोवन वार्ता
बेळगाव : बेळगाव ते गोवा व्हाया चोर्ला या रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे चालक आणि प्रवाशांतून संताप व्यक्त होत होता. याविषयीचे वृत्त दै. ‘गोवन वार्ता’मध्ये शनिवारी पान १ वर प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर शनिवारी सकाळपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि कर्नाटक सार्वजनिक बांधकाम खाते यांनी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे प्रवाशांतून समाधान व्यक्त होत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने शनिवारी सकाळपासून कामाला सुरुवात केली. कणकुंबी ते जांबोटी या ८ किमी रस्त्यावरील खड्डे भरले जात आहेत. या कामावर अभियंते देखरेख ठेवून आहेत. अभियंता राजेंद्र यांनी सांगितले की, पाऊस खूप असल्यामुळे फारसे काम शक्य होणार नाही; मात्र तातडीची उपाययोजना म्हणून आम्ही खड्डे भरत आहोत. पावसाळ्यानंतर कायमस्वरूपी दुरुस्ती प्राधान्याने केली जाईल. दोन्ही बाजूंना पाण्याच्या निचऱ्यासाठी गटार नाही. झाडांच्या फांद्यांमुळे रस्ता खराब आहे. या कामांसाठी वन खात्याची परवानगी आवश्यक आहे.
या संदर्भात उपवनसंरक्षक मारिया ख्रिस्तू राजा म्हणाले, क्षेत्रीय वनाधिकाऱ्याला अहवाल तयार करण्यास सांगितले आहे. अहवाल मिळाल्यानंतर प्रवाशांच्या हितासाठी आवश्यक परवानगी दिली जाऊ शकते.