विरोधक आक्रमक : प्रश्न लॉटरी पद्धतीनेच सभापतींचे स्पष्टीकरण
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : अधिवेशनात प्रश्नोत्तराला सत्ताधारी आणि विरोधी आमदारांचे प्रश्न एकानंतर एक घेण्याची मागणी नाकारल्यानंतर विरोधी आमदारांनी आक्रमक पवित्रा घेत कामकाज सल्लागार समितीच्या (बीएसी) बैठकीतून सभात्याग केला. बैठक संपल्यानंतर समितीचे सदस्य बाहेर पडले. त्यामुळे सभात्याग झालेला नाही, असा दावा सभापती रमेश तवडकर यांनी केला.
विधानसभेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलै ते ८ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. अधिवेशनाचे कामकाज निश्चित करण्यासाठी सभापती तवडकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बीएसीची बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उपसभापती जोशुआ डिसोझा, विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव, गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई, आरजीपीचे आमदार वीरेश बोरकर, आपचे आमदार व्हेंझी व्हिएगस उपस्थित होते.
प्रश्नोत्तराला सत्ताधारी आणि विरोधकांचे प्रश्न घ्यावेत, दररोज विरोधी आमदारांच्या दोन लक्षवेधी सूचना घ्याव्यात, अशा मागण्या आम्ही केल्या होत्या. एकही मागणी मंजूर न झाल्यामुळे आम्ही बैठकीतून सभात्याग केेला, असे विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव आणि विजय सरदेसाई यांनी सांगितले. मागण्यांवर बोलण्यासाठी विरोधी आमदारांना फक्त २० मिनिटे दिली आहेत. त्यामुळे विरोधी आमदारांना प्रश्न मांडण्याची समान संधी मिळणार नाही. सत्ताधारी आमदारांची संख्या अधिक असल्यामुळे त्यांचे प्रश्न अधिक येतील, अशी व्यवस्था केली आहे, असे व्हेंझी व्हिएगस म्हणाले.
लॉटरी पद्धतीने प्रश्नांची होणार निवड : सभापती
प्रश्नांची निवड नेहमीच लॉटरी पद्धतीने होत असते. सीसीटीव्ही कॅमेऱ्यासमोर लॉटरी काढली जाईल. ही पद्धत पूर्वीपासून आहे. बीएसी बैठकीत अधिवेशनातील कामकाजावर चर्चा झाली. दिवसाचे कामकाज साडेआठ तास चालले पाहिजे. अधिवेशन १५ दिवसांचे असल्याने सर्वांना बोलण्याची संधी मिळेल. बैठक संपल्यानंतर सर्वजण बाहेर पडले. बैठकीत सभात्याग झालेला नाही, असे सभापती रमेश तवडकर यांनी स्पष्ट केले.
ही लोकशाहीची हत्या : युरी आलेमाव
बेरोजगारी, बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, ड्रग्जचा वाढता व्यवहार, असे बरेच प्रश्न आहेत. राज्याचे वा लोकांचे प्रश्न विधानसभेत मांडण्याची संधी विरोधी आमदारांना सरकार देत नाही. ही लोकशाहीची हत्या आहे. विरोधी आमदारांच्या मागण्या मान्य न केल्यामुळे आम्ही सभात्याग केला, असे विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी बैठकीनंतर सांगितले.
प्रश्नोत्तराला विरोधी आमदारांना प्रश्न मांडण्याची समान संधी देण्याला सभापती तयार नाहीत. गोमंतकीयांचे प्रश्न मी समजून घेतले आहेत. त्यावर सभागृहात बोलायला मला पुरेसा म्हणून वेळ मिळणार नाही. ही आणीबाणीची स्थिती आहे. बैठकीतून आम्ही सभात्याग केला.
_ विजय सरदेसाई, आमदार, गोवा फॉरवर्ड
.......
बीएसी बैठकीत कामकाज ठरवायचे असते. सभापती सरकारला हवे त्याप्रमाणे निर्णय घेतात. बीएसीच्या बैठकीला अर्थच राहिलेला नाही. विरोधी आमदारांची एकही मागणी मान्य झाली नाही. त्यामुळे आम्ही सभात्याग केला.
_ वीरेश बोरकर, आमदार, आरजी