सध्याचे पावसाळी वातावरण भात शेतीला अनुकूल

कृषी अधिकाऱ्यांची माहिती : पाऊस थांबून थांबून पडत असल्यामुळे पाणी साचून बियाणे कुजण्याची भीती नाही


3 hours ago
सध्याचे पावसाळी वातावरण भात शेतीला अनुकूल

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : सध्याचे मान्सूनचे हवामान गोव्यातील शेतीसाठी अत्यंत अनुकूल आहे, असे कृषी विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. राज्यात पुरेसा पाऊस होत असून, त्यामुळे शेतकरीही आनंदात आहेत. शेतीतील पिकांना आवश्यकतेनुसार पाऊस योग्य वेळी पडत आहे. त्यामुळे पिकांना फायदा होत आहे, असेही ते म्हणाले.
गेल्या वर्षी जून महिना कोरडा गेल्याने शेतीतील कामे उशिरा सुरू झाली होती. नंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचून पिकांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र, यंदा मान्सूनचा हंगाम भात लागवडीसाठी अधिक पोषक ठरला आहे. जूनच्या आधीच एक आठवडा पाऊस सुरू झाला. यामुळे नांगरणी सोपी झाली आणि भात लागवडीचा हंगाम लवकर सुरू झाला. कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले की, हीच स्थिती कायम राहिली तर यावर्षी चांगले पीक येऊ शकते. मात्र, कित्येकदा अतिवृष्टीमुळे शेती पाण्याखाली जाऊन बियाणे कुजण्याची शक्यता असते. तसे झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. सध्याची पावसाची स्थिती भाताच्या वाढीसाठी अनुकूल आहे.
मागील महिन्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे सखल भागातील खाजन शेतीची लावणी सुरू झाली होती. डोंगराळ भागातील शेतांना अद्याप पुरेसे पाणी मिळालेले नाही. त्यामुळे या भागातील शेतांची लावणी उशिरा झाली आहे.
अधूनमधून पाऊस भात पिकासाठी उपयुक्त
जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने थोडी विश्रांती घेतली; पण शेती करण्याची वेळ आली, तेव्हा पावसाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला. शेतात लावणी केल्यानंतर लगेचच तीन-चार दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतात योग्य प्रमाणात पाणी भरले. त्यामुळे भाताचे पीक चांगल्याप्रकारे वाढीस लागले आहे. सध्या अधूनमधून पाऊस पडत असून, असा पाऊस हा भातशेतीसाठी उपयुक्त असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.                  

हेही वाचा