वाळपईतील प्रकार : स्वत:च्या अकाऊंटवर पैसे केले जमा
प्रतिनिधी। गोवन वार्ता
वाळपई : येथील ‘मेडी प्राईम’ या फार्मसीच्या व्यवहारात १२ लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी पोलिसांनी कर्मचारी हिना खान (रा. नाणूस-सत्तरी) हिच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या गैरव्यवहारात तिचा थेट संबंध असल्याचा आरोप मेडी प्राईम या आस्थापनाच्या मालकांनी केला आहे. या संदर्भात वाळपई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाळपई शहरात गेल्या काही वर्षांपासून ‘मेडी प्राईम’ नावाची फार्मसी कार्यरत आहे. या संस्थेचा व्यवहार सांभाळणाऱ्या हिना खान यांनी दररोज येणारी रोकड कंपनीच्या बँक खात्यावर जमा करण्याऐवजी आपल्या स्वतःच्या बँक खात्यात जमा केली. याबाबतची तपासणी केल्यानंतर कंपनीच्या बँक खात्यात अपेक्षेपेक्षा कमी पैसे आल्याचे दिसून झाले. चौकशी केल्यानंतर फार्मसीमधून येणारी रोकड कंपनीच्या खात्यावर जमा न होता दुसऱ्याच खात्यावर जमा होत असल्याचे स्पष्ट झाले. सखोल चौकशी केल्यानंतर या प्रकाराची तक्रार वाळपई पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली. या कंपनीचा व्यवहार पाहणाऱ्या हिना खान यांच्याकडून हा अपहार झाल्याचे आस्थापन मालकाचे म्हणणे आहे. यामुळे या संदर्भाचा गुन्हा वाळपई पोलीस स्थानकावर दाखल करण्यात आला आहे. वाळपई पोलीस स्थानकाचे निरीक्षक विद्देश शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक खुशाली नाईक अधिक तपास करीत आहेत.
संशयित हिनाच्या खात्यावर दररोज रोख रक्कम जमा
आस्थापनाच्या मालकाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, याबाबत सदर कर्मचाऱ्यांच्या बँक खात्याची तपासणी करण्यात आली असता दरम्यानच्या कार्यकाळात सदर खात्यावर दररोज रोख रक्कम जमा झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. यामुळे या फार्मसीची रोकड कंपनीच्या खात्यावर जमा करण्याऐवजी हिना खान हिने स्वतःच्याच खात्यावर जमा केल्याचे स्पष्ट झाले.