गिरी येथे स्कूटर-बस अपघातात कायदा अवर सचिव नारायण अभ्यंकर यांचा मृत्यू

बस चालकाला अटक : शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन


09th July, 12:04 am
गिरी येथे स्कूटर-बस अपघातात कायदा अवर सचिव नारायण अभ्यंकर यांचा मृत्यू

गिरी येथे झालेल्या अपघातातील अपघातग्रस्त वाहने इन्सेटमध्ये नारायण अभ्यंकर. (उमेश झर्मेकर)
...
प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा : गिरी-म्हापसा येथील ग्रीन पार्क जंक्शनवरील उड्डाण पुलानजीक बसने स्कूटरला ठोकर दिली. या अपघातात बसच्या चाकाखाली चिरडले गेल्याने कायदा खात्याचे अवर सचिव नारायण अभ्यंकर (५१, रा. रामनगर, कोलवाळ- बार्देश) यांचा जागीच मृत्यू झाला. अभ्यंकर शांत स्वभावाचे अधिकारी म्हणून ओळखले जात होते. पर्वरी येथील सचिवालयात ते सेवा बजावत होते.
हा अपघात मंगळवारी सकाळी १०.४५ च्या सुमारास घडला. नारायण अभ्यंकर ज्युपिटर (क्र. जीए ०३ एएस ८८३६) स्कूटरवरून कोलवाळहून पर्वरीकडे जात होते. त्याचवेळी प्रवासी बस (क्र. जीए ०७ एफ ५६७९) घेऊन चालक प्रेमानंद कानोजी (६२, रा. धुळेर म्हापसा) म्हापसाहून पणजीकडे जात होते. अभ्यंकर ग्रीनपार्क उड्डाण पूल ओलांडून थोड्या अंतरावर पोहोचल्यानंतर सर्व्हिस रोडवरून महामार्गावर येणाऱ्या बसने त्यांच्या स्कूटरला मागून धडक दिली. त्यामुळे अभ्यंकर यांचे स्कूटरवरील नियंत्रण सुटले व ते डाव्या बाजूला बसखाली कोसळले आणि चाकाखाली चिरडले गेले. त्यांची स्कूटर उजव्या बाजूने सुमारे १० मीटरवर जाऊन दुभाजकानजीक कोसळली.
अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक खोळंबली. माहिती मिळताच म्हापसा पोलिसांसह कमांडो जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक निखील पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्तप्रसाद पंडित व हवालदार सागर आगरवाडेकर यांनी अपघाताचा पंचनामा केला. संशयित बस चालकाला ताब्यात घेतले. पंचनाम्यानंतर मृतदेह गोमेकॉत पाठवण्यात आला. सायंकाळी शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला. अपघातग्रस्त वाहने हटवून वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. वाहतूक पोलीस अधीक्षक प्रबोध शिरवईकर यांनी अधिकाऱ्यांसह घटनास्थळाची पाहणी केली.
सर्व्हिस रोडवर स्पीडब्रेकर गरजेचा
गिरी येथे सर्व्हिस रोड जेथे महामार्गाला जोडतो, तेथे सर्व्हिस रोडवर स्पीडब्रेकर बसविणे गरजेचे आहे. सर्व्हिस रोडवरून वाहने वेगाने महामार्गावर येतात. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढते. सर्व्हिस रोडवर स्पीडब्रेकर बसवल्यास वाहनांचा वेग कमी होऊन अपघात टळू शकतात.