धिरयोंवर लक्ष ठेवण्यासाठी सात समित्यांची नियुक्ती

दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांचा आदेश : समितीमध्ये अधिकाऱ्यांसह प्राणीमित्रही


09th July, 11:45 pm
धिरयोंवर लक्ष ठेवण्यासाठी सात समित्यांची नियुक्ती

प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : धिरयोंवर लक्ष ठेवण्यासाठी व कारवाई करण्यासाठी दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांनी सात समित्यांची स्थापना केली आहे. यात मामलेदार, पोलीस निरीक्षक, पशुसंवर्धन अधिकारी व पशुकल्याण संघटनांचा समावेश आहे.
दक्षिण गोवा जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस यांनी धिरयो व प्राण्यांच्या झुंजीवर लक्ष ठेवून कारवाईसाठी समिती स्थापन केल्या आहेत. धिरयो व प्राण्यांच्या झुंजीबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार, आता मडगाव, मायना कुडतरी, कोलवा, फातोर्डा, कुंकळ्ळी, वेर्णा, मुरगाव या विभागनिहाय समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. समितीमध्ये मामलेदार, त्या भागातील पोलीस निरीक्षक, पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यासह प्राण्यांच्या कल्याणासाठी व संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या संस्थांच्या पदाधिकार्‍यांचा समावेश आहे. या समितीकडून धिरयो होत असल्याची माहिती मिळताच तत्काळ कारवाई करावी. समितीतील पदाधिकार्‍यांनी परस्परांशी योग्य संवाद राखावा. संवेदनशील भागात कारवाई करताना योग्य ती काळजी घ्यावी. सदर अधिकार्‍यांच्या अनुपस्थितीत परिस्थिती हाताळण्यासाठी दुसर्‍या अधिकार्‍याची नेमणूक करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
लाखोंची बेटिंग
दक्षिण गोव्यातील बाणावली, कोलवा, फातोर्डा, बेताळभाटी, वार्का, सुरावली या भागात धिरयोंचे आयोजन होत असते. यापूर्वी आठवड्याला तीन ते चारवेळा धिरयो होत होत्या. आता पोलीस कारवाईमुळे महिन्याला तीन ते चार ठिकाणी धिरयोचे आयोजन होत असते. याची माहिती समाजमाध्यमावरून धिरयोप्रेमींना मिळते. लाखोंची बेटिंग या झुंजींवर लागते. परदेशातील गोमंतकीयांकडूनही बेटिंग केले जाते.
धिरयोला कायदेशीर मान्यतेची मागणी
प्राण्यांवरील क्रूरतेचा विचार करून उच्च न्यायालयाने धिरयोवर १९९७ मध्ये बंदी आणली. ही बंदी अद्यापही कायम आहे. धिरयो हा गोव्यातील पारंपरिक खेळ असून जलिकट्टू खेळाप्रमाणे धिरयो खेळाला कायदेशीर मान्यता मिळावी, अशी मागणीही लोकप्रतिनिधींकडूनही होत आहे.
धिरयोविषयीच्या काही घटना...
२८ एप्रिल रोजी सुरावली येथे झालेल्या बैलांच्या धिरयोमध्ये एका बैलाचा मृत्यू झाला. कोलवा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद केला.
१६ जून रोजी कोलवा परिसरात धिरयोचे आयोजन केले होते. माहिती मिळताच दक्षिण गोवा पोलीस अधीक्षकांनी धिरयो होण्याआधीच कारवाई केली.
२०२४ मध्ये बाणावली येथील बैलांच्या झुंजीत जखमी झालेले जानेटो वाझ (३९) यांचा नंतर मृत्यू झाला.
धिरयोबाबत उत्तर गोव्यात होणार कारवाई
धिरयो व बैलांच्या झुंझीबाबत उत्तर गोव्यातही जागृती होणार आहे. पंचायती, नगरपालिका, सामाजिक संस्था यांच्या मदतीने पोलीस जागृती करणार आहेत. उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अंकीत यादव यांनी ही माहिती दिली. अतिरिक्त जिल्हाधिकारी गुरुदास देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक झाली. या बैठकीला पोलीस अधिकाऱ्यांसह प्राणीमित्र संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. धिरयोंवर कायद्याने बंदी आहे. प्राणी क्रूरताविरोधी कायद्याच्या कार्यवाहीसाठी जागृती, तसेच जनतेकडून सहकार्य कसे मिळेल, यावर बैठकीत चर्चा झाली.