खानापूर : एकीकडे अस्वलांच्या कळपाने केला पाठलाग, तर दुसऱ्या वाटेवर गव्यांनी गाठले

यांच्या तावडीतून तरुणाने जीव सोडवला तर गाय लागली मागे; खानापूरच्या भीमगड अभयारण्यात घडलेल्या गजब घटनेने सगळेच अवाक!

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
8 hours ago
खानापूर : एकीकडे अस्वलांच्या कळपाने केला पाठलाग, तर दुसऱ्या वाटेवर गव्यांनी गाठले

खानापूर : भीमगड अभयारण्याच्या कुशीत वसलेल्या पास्टोली गावातील ३५ वर्षीय युवक दिगंबर बळवंत पाटील याने एकाच वेळी तीन वेगवेगळ्या जंगली प्राण्यांचा – अस्वल, गवे आणि गाईचा – सामना करत कसाबसा आपला जीव वाचवला. या थरारक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे.

नेमके प्रकरण काय ? 

दिगंबर पाटील हा तब्येत बिघडल्याने उपचारांसाठी खानापूरला डॉक्टरांकडे जात असताना कोंगळा गावाजवळील लाकडी साकवाजवळ अस्वलांचा कळप अचानक त्याच्या मागे लागला. खड्डेमय रस्त्यातून वाट काढून त्याने दुसऱ्या वाटेवर गाडी वळवली. एका ठिकाणी लघुशंकेसाठी त्याने दुचाकी बाजूला लावली व चालतच पुढे गेला. १०-२० मीटर अंतरावर चालत गेला असेल. तेवढ्यात गव्यांचा कळप व लहान वासरे रस्त्यात आडवे आली. दिगंबरला पाहताच ते चवताळले आणि त्याच्या दिशेने धावत आले. जिवाच्या आकांताने पळालेल्या दिगंबरने जवळच्याच झाडावर चढून स्वतःचा जीव वाचवला. जवळपास अर्धा तास गवे झाडाखालीच थांबले होते. गवे निघून गेल्यावर तो खाली उतरला आणि दुचाकीजवळ पोहोचला.

दुचाकी सुरू करून तो पुन्हा खानापूरच्या दिशेने निघाला असता रस्त्यात एका रानगायीने त्याच्यावर शिंगे उगारत हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याने कसाबसा बचाव करत गाडी मार्गी लावली. काही वेळ गायीने पाठलाग केला, पण शेवटी दिगंबर खानापूरात पोहोचला आणि त्याने हा संपूर्ण प्रसंग आपल्या मित्रांना कथन केला. केवळ दैव बलवत्तर होते म्हणूनच वाचलो, असे त्याने सांगितले.

या घटनेनंतर या परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याआधी आठवड्याभरापूर्वी याच गावातील ज्ञानेश्वर गावडे यांच्या घराच्या पडवीत अस्वल घुसले होते. त्यावेळी घरात एकटी असलेल्या त्यांच्या वृद्ध आईने आरडाओरड करत आपला जीव वाचवला होता. यानंतर ग्रामस्थांनी धाव घेत अस्वलाला पळवून लावले.

या घटना लक्षात घेता, वनविभाकडून ठोस उपाययोजना आणि संरक्षणात्मक पावले उचलण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. भीमगड अभयारण्यालगत असलेल्या वस्तीतील नागरिक सध्या धास्तावले आहेत. हिंस्र वन्यजीवांचा बंदोबस्त करण्यासाठी संबंधित प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी, अशी जोरदार मागणी आता होत आहे.

हेही वाचा