तामिळनाडूमध्ये रेल्वे क्रॉसिंगवर भीषण अपघात: प्रवासी ट्रेनची स्कूल व्हॅनला धडक

तीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू, संतप्त जमावाकडून रेल्वे गेटमॅनला मारहाण

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
6 hours ago
तामिळनाडूमध्ये रेल्वे क्रॉसिंगवर भीषण अपघात: प्रवासी ट्रेनची स्कूल व्हॅनला धडक

कुड्डालोरः तामिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यातील सेम्मनकुप्पम येथे आज मंगळवारी सकाळी प्रवासी रेल्वेने शाळेच्या व्हॅनला धडक दिल्याची घटना घडली असून या अपघातात तीन शाळकरी मुलांचा जागीच मृत्यू झाल्याची खळबळजनक माहिती हाती आली आहे. व्हॅन चालकासह इतर दोघे गंभीर जखमी झाले असून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

वैद्यकीय मदत व्हॅनसह, बचाव पथक आणि रेल्वे दलाचे मदत पथक घटनास्थळी पोहोचले असून विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) आणि शाखा अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करत आहेत.

या अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार कृष्णस्वामी विद्यानिकेतन या खाजगी सीबीएसई शाळेची व्हॅन कुड्डालोर आणि अलप्पक्कम दरम्यानचे रेल्वे लेव्हल क्रॉसिंग गेट (क्रमांक १७०-नॉन-इंटरलॉक्ड गेट) ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना तिला विल्लुपुरम-मयिलादुथुराई पॅसेंजरने धडक दिली.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज शर्मा नावाचा रेल्वे गेटकीपर गेट बंद करत असताना, व्हॅन चालकाने व्हॅनला गेट ओलांडण्याचा (Railway Crossing) आग्रह धरला. परिणामी पंकज शर्मा नियोजित वेळेत गेट बंद करू शकला नाही, आणि त्यामुळेच ही दुर्देवी घटना घडली. या घटनेनंतर संतप्त जमावाने गेटकीपरला मारहाण केल्याचे वृत्त हाती आले आहे.

रेल्वे गेट कीपरला अटक
दरम्यान तीन शाळकरी मुलांचा मृत्यू प्रकरणी पंकज शर्मा या रेल्वे गेटकीपरला अटक करण्यात आली आहे. यापूर्वी, निष्काळजीपणाबद्दल त्याला निलंबित करण्यात आले होते.

राज्यपालांकडून शोक व्यक्त
तमिळनाडूचे राज्यपाल आर.एन. रवी यांनी शोक व्यक्त केला आहे. एक्स या डिजिटल प्लॅटफॉर्मवर त्यानी असे म्हटले आहे की, "कुड्डालोर जिल्ह्यातील सेम्मनकुप्पम येथील रेल्वे-लेव्हल क्रॉसिंगवर स्कूल व्हॅन-ट्रेनच्या धडकेत निष्पाप शाळकरी मुलांचे दुःखद निधन झाल्याने मला खूप दुःख झाले आहे. शोकाकुल कुटुंबांना माझ्या मनःपूर्वक संवेदना असून जखमींना दीर्घायुष्य मिळावे यासाठी मी प्रार्थना करत आहे."

मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी जखमींना आणि मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर केली आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मुलांच्या पालकांना मुख्यमंत्री मदत निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याचे आदेश मी दिले आहेत. शिवाय, गंभीर जखमी झालेल्या आणि उपचार घेत असलेल्यांना प्रत्येकी १ लाख रुपये आणि किरकोळ जखमी झालेल्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती स्टॅलिन यांनी मीडियासमोर दिली आहे.

रेल्वेकडून मदत जाहीर
दक्षिण रेल्वेने आपल्या निवेदनात मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपये, गंभीर जखमींच्या नातेवाईकांना २.५ लाख रुपये आणि इतर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

हेही वाचा