सोशल : शेतीच्या मशागतीचा खर्च परवडेना; लातूरच्या वृद्ध शेतकरी दांपत्याने स्वतःलाच जुंपले औताला!

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतली दखल; अभिनेते सोनू सुदही मदतीसाठी सरसावले.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
6 hours ago
सोशल : शेतीच्या मशागतीचा खर्च परवडेना; लातूरच्या वृद्ध शेतकरी दांपत्याने स्वतःलाच जुंपले औताला!

लातूर : अन्नदाता असलेल्या शेतकऱ्याची आजची स्थिती किती हालअपेष्टांची आहे, हे दाखवणारा एक हृदयद्रावक प्रकार महाराष्ट्राच्या  लातूर जिल्ह्यातील हाडोळती गावात घडला आहे. अंबादास गोविंद पवार या ६५ वर्षीय शेतकऱ्याने शेतीच्या मशागतीसाठी बैल नसल्याने स्वतःला औताला जुंपून घेतले आहे. गेल्या सात-आठ वर्षांपासून ते हे काम स्वतःच्या श्रमावर करत असून यावर्षीही ते आणि त्यांची पत्नी दोघे मिळून शेतात राबत आहेत.


पवार यांच्याकडे अडीच एकर कोरडवाहू जमीन आहे. ट्रॅक्टर किंवा बैल जोड्यांचा खर्च परवडत नसल्याने त्यांनी स्वतःच्या शरीरावर मेहनतीचे ओझे घेतले आहे. वयाच्या ६५व्या वर्षी ते आपल्या ६० वर्षीय पत्नीच्या मदतीने शेताची मशागत करत आहेत. बियाणे, खत, मजुरी यांचे वाढते दर आणि शेतीमालाला मिळणारा अत्यल्प भाव आणि त्यामुळे कधीही न भरून येणारा तोटा यामुळे हे कुटुंब कधीही मोडून पडू शकते, अशी परिस्थिती आहे. 



या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून याची गंभीर दखल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतली आहे. आयोगाच्या सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखालील न्यायपीठाने लातूर जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस बजावली असून या प्रकरणात ‘अ‍ॅक्शन टेकन रिपोर्ट’ मागवण्यात आला आहे.


या व्हिडीओच्या माध्यमातून प्रकरण प्रसिद्ध अभिनेते सोनू सूद यांच्यापर्यंत पोहोचले. त्यांनी या शेतकऱ्याशी थेट संपर्क साधून त्यांना बैलांची जोडी पाठवण्याचा संदेश दिला. त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून या बाबत माहिती देत समाजाला एक सकारात्मक संदेश दिला. या घटनेमुळे देशातील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. सरकारच्या शेतीविषयक धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, ही घटना केवळ एक बातमी बनून न राहता धोरणकर्त्यांना जागे करणारी ठरावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा