दक्षिण गोवा जिल्हाधिकार्यांकडून आदेश जारी
मडगाव : धिरयोंवर लक्ष ठेवण्यासाठी व कारवाई करण्यासाठी दक्षिण गोवा जिल्हाधिकार्यांकडून सात समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. यात मामलेदार, पोलीस निरीक्षक, पशुसंवर्धन अधिकारी व पशुकल्याण संघटनांचा समावेश आहे.
दक्षिण गोवा जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस यांनी धिरयो व प्राण्यांच्या झुंजीवर लक्ष ठेवून कारवाईसाठी समिती स्थापन केल्या आहेत. धिरयो तसेच प्राण्यांच्या झुंजीबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार आता मडगाव, मायना कुडतरी, कोलवा, फातोर्डा, कुंकळ्ळी, वेर्णा, मुरगाव या विभागानिहाय समित्यांच्या स्थापना करण्यात आल्या आहेत. या समितीमध्ये मामलेदार, त्या भागातील पोलीस निरीक्षक, पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यासह प्राण्यांच्या कल्याणासाठी व संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या संस्थांच्या पदाधिकार्यांचा समावेश आहे. या समितीकडून आपापल्या भागांत धिरयो होत असल्याची माहिती मिळताच तत्काळ आवश्यक कारवाई करावी. समितीतील पदाधिकार्यांनी एकमेकांशी योग्य संवाद राखावा व संवेदनशील भागात कारवाई करताना योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. सदर अधिकार्यांच्या अनुपस्थितीत परिस्थिती हाताळण्यासाठी दुसर्या अधिकार्यांची नेमणूक करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.