भाजप एसटी मोर्चाचा आरोप : उटावर सरकारने नव्हे, निबंधकांनी घातली बंदी
पणजी : प्रकाश वेळीप यांनी आतापर्यंत राजकीय स्वार्थासाठी आदिवासी समाजाचा वापर केला असून, भारतीय जनता पक्षात असतानाही त्यांनी निवडणुकीत पक्षविरोधात काम केल्याचा गंभीर आरोप भाजप एसटी मोर्चाचे अध्यक्ष प्रभाकर गावकर यांनी केला आहे. आदिवासी समाजाच्या नावाखाली भाजप सरकारवर केलेले तथ्यहीन आरोप एसटी मोर्चा सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
प्रभाकर गावकर यांनी स्पष्ट केले की, भाजप सरकारने उटा (युनायटेड ट्राइबल्स असोसिएशन) या संघटनेवर बंदी घातलेली नसून, निबंधकांनी ती बंदी घातली आहे. या पत्रकार परिषदेला माजी आमदार वासुदेव गावकर, संजना वेळीप, खोलाचे जिल्हा पंचायत सदस्य शाणू वेळीप, गोपाळ सुर्लकर, मोहन गावकर, अँथनी बार्बोजा यांच्यासह एसटी नेते उपस्थित होते.
प्रभाकर गावकर यांनी म्हटले की, वेळीप हे दीर्घकाळ आमदार आणि मंत्री होते. त्यांनी आदिवासी समाजाचे नेते म्हणून विविध पदे भूषवली, परंतु त्यांनी आदिवासी समाजाच्या विकासासाठी काहीही केलेले नाही. आता उटावर बंदी घातल्यानंतर ते भाजप सरकारला दोष देत आहेत. सरकारने उटावर बंदी घातलेली नाही; बंदी लादण्याच्या निबंधकाच्या आदेशाला ते न्यायालयात आव्हान देऊ शकतात. मात्र, आव्हान न देता ते भाजपला दोष देत आहेत, असे गावकर म्हणाले.
भाजप सरकारचे आदिवासींसाठीचे कार्य
माजी आमदार वासुदेव गावकर यांनी भाजप सरकारच्या कार्यकाळात एसटी आयोगाची स्थापना झाल्याचे आणि अनेक कल्याणकारी योजना सुरू करण्यात आल्याचे सांगितले. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी मोठ्या प्रमाणात काम झाले आहे. एसटी आरक्षण विधेयक संसदेत सादर करण्यात आले असून, ते संमत झाल्यास आदिवासींना राजकीय आरक्षण मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
फसवणुकीचा व्यापार थांबवण्याचे आवाहन
- गोपाळ सुर्लकर यांनी प्रकाश वेळीप केवळ फसवणूक करत असल्याचे सांगत, त्यांनी अशा प्रकारचे आरोप आणि फसवणुकीचा व्यापार थांबवावा, असे आवाहन केले.
- वेळीप सध्या भाजपमध्ये नाहीत, असे त्यांनीच स्पष्ट केले आहे. भाजपात असतानाही त्यांनी विधानसभा आणि जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांविरोधात काम केले होते, असे मोहन गावकर यांनी सांगितले.
भाजप सरकारने एसटी आणि आदिवासी समुदायांसाठी खूप काही केले असून, आदिवासी समाजाला राजकीय आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरू आहे. वेळीप यांचे आरोप बेजबाबदार असून, ते आदिवासी समाज सहन करणार नाही. - प्रभाकर गावकर, अध्यक्ष, भाजप एसटी मोर्चा