रतनगढमधील भानुदा गावाजवळ दुर्घटना; विमान कोसळण्याचं कारण अद्याप गुलदस्त्यात
रतनगढः राजस्थानच्या चुरुमधील रतनगढ भागातील भानुदा गावात आज भारतीय हवाई दलाचं एक विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याची माहिती मिळाली आहे. विमान दुर्घटनेमध्ये पायलटचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस आणि प्रशासनाची पथकं तातडीनं घटनास्थळी रवाना झाली आहेत. ज्या भागात विमान कोसळलं तो वाळवंटी प्रदेश असल्याची माहिती मिळाली आहे.
अपघातग्रस्त विमान भारतीय वायुदलाचे असल्याचे सांगितले जात आहे. विमान कोसळल्यानंतर त्याचे तुकडे तुकडे झाले. गावानजीकच्या शेतामध्ये हे विमान कोसळलं. विमानाच्या तुकड्यांजवळच एक मृतदेह आढळून आला असून त्या मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. जिल्हाधिकारी अभिषेक सुराणा आणि स्थानिक पोलीस अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत. लष्कराचे बचाव पथकही घटनास्थळी पोहचले आहे.
विमान शेतात पडल्यानंतर शेतामध्ये आग
गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आकाशात मोठा आवाज झाला आणि विमान झाडावर पडलं. ते झाड देखील पूर्णपणे जळून गेलं असून विमान शेतात पडल्यानंतर शेतामध्ये आग लागली. गावकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला होता. आग विझवण्यास सुरुवात केल्यानंतर एक मृतदेह सापडला आहे. दरम्यान हे विमान का कोसळलं यासंदर्भात अजून कोणतीही माहिती मिळाली नाही.