वडोदरा : गुजरातमधील पादरा भागात आज बुधवारी सकाळी भीषण दुर्घटना घडली. वडोदरा आणि आनंद जिल्ह्याला जोडणारा महिसागर नदीवरील गंभीरा पुल अचानक कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाला असून, किमान तीनजण जखमी झाल्याची माहिती आहे.
सकाळी साडेसातच्या सुमारास हा पुल कोसळला. घटनेची माहिती मिळताच प्रशासन व बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. बचावकार्य अजूनही सुरु असून पाणबुडे आणि अग्निशमन दल घटनास्थळी कार्यरत आहेत. दोन ट्रक, एक कार आणि काही दुचाकी वाहने नदीत कोसळली असून, एक ट्रक अजूनही पुलावर अडकलेला आहे. चार जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.
जुना आणि धोकादायक पुल ठरला सरकारी अनास्थेचा बळी
मिळालेल्या माहितीनुसार, हा पुल ४३ वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता आणि सौराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांसाठी टोल वाचवण्याचा पर्यायी मार्ग म्हणून वापरला जात होता. पुलाची अवस्था गेल्या काही वर्षांपासून धोकादायक होती. स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही कोणतीही दुरुस्ती करण्यात आली नव्हती. या पुलाचे काम व्हावे यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला. सरकारची अनास्था आणि लालफितीचा भोंगळ कारभार यामुळे ही घटना घडली.
नवीन पुलाची योजना कागदावरच
या पुलाशेजारी नवीन पुल बांधण्याचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. मात्र अद्याप काम सुरू होऊ शकलेले नाही. परिणामी जुन्या पुलावर वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. या घटनेमुळे वडोदरा आणि आनंद परिसरातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. वडोदरा जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, अद्याप पर्यायी मार्ग उपलब्ध करून देता आलेला नाही. नदीचा प्रवाह तीव्र असल्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. ही दुर्घटना प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे व एक धोकादायक पायाभूत सुविधांच्या दुर्लक्षित देखभालीचे उदाहरण ठरले असून, नागरिकांत संतापाची भावना आहे.