जमिनीच्या तुकड्यापेक्षा नात्यांना प्राधान्य देत परभणीच्या दहिफळे कुटुंबाने घातला नवा आदर्श
परभणी : संपत्तीच्या वाटपावरून भाऊबंदकी, वाद, कोर्टकचेऱ्या, मारामारी आणि प्रसंगी होणाऱ्या खुनाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील खादगाव येथील दहिफळे कुटुंबाने नात्यांना प्राधान्य देत एक आदर्शवत शेतवाटणी केली आहे. त्यांच्या निर्णयाची सध्या सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर प्रशंसा होत आहे.
रंगनाथ दहिफळे (वय ९१) या कुटुंबप्रमुखांनी आपले आयुष्य शांततेत पुढे जावे यासाठी आपल्या तिन्ही मुलांना आपल्या डोळ्यांदेखत शेती वाटून दिली. त्यांना तीन मुले आहेत. प्रा. डॉ. बाळासाहेब, प्रा. युवराज (दोघे उदगीर येथे प्राध्यापक), आणि मधला मुलगा केशव. केशव शेतीत राबतो हे लक्षात घेऊन दोघा भावांनी साडेसहा एकरांपैकी ओलीताखालील साडेचार एकर जमीन केशवला दिली गेली. उरलेली कोरडवाहू जमीन प्राध्यापक भावांनी आपसात वाटून घेतली.
विशेष म्हणजे केवळ शेतीच नव्हे, तर केशवच्या मुलांचं शिक्षण आणि मुलीच्या लग्नाची जबाबदारीही दोन्ही प्राध्यापक भावांनी स्वतःवर घेतली. ही शेतवाटणी खेळीमेळीच्या वातावरणात, आई-वडिलांच्या समोर आणि तिन्ही भावांच्या पत्नींच्या सहमतीने पार पडली. सर्वांनी मिळून घेतलेला हा निर्णय ‘एकत्रित कुटुंब पद्धती’चा उत्कृष्ट नमुना ठरला.
आज ज्या समाजात संपत्तीवरून तुटलेल्या नात्यांची उदाहरणे पाहायला मिळतात, तिथे दहिफळे कुटुंबाने दाखवलेली एकजूट, समंजसता आणि माणुसकीचा आदर्श सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. शेतीपेक्षा नाती मोठी हे त्यांनी कृतीतून सिद्ध केले आहे. दहिफळे कुटुंबाच्या या निर्णयाने परभणी जिल्ह्याचाच नव्हे, तर संपूर्ण राज्यातील ग्रामीण समाजात एक सकारात्मक संदेश दिला आहे.