गोवा विद्यापीठात गोवेकरांना दूर ठेवण्याचा डावः कुलगुरूंविरोधात रोष
पणजी: विद्यापीठातील महत्त्वाच्या पदांवर बाहेरील लोकांना नियुक्त करण्याचा आणि त्यासाठी गोवा रहिवासी प्रमाणपत्राची आवश्यकता रद्द करण्याचा मास्टर प्लॅन गोवा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. हरिलाल मेनन यांनी सुरू केला आहे. त्यामुळे, गोवा विद्यापीठाचे मानांकन (रॅकिंग) घसरल्याबद्दल गोव्यातील प्राध्यापकांना दोष देणे हा एकप्रकारे गोवेकरांचा अपमान आहे. त्यामुळे कुलगुरू मेनन यांनी माफी मागावी अन्यथा ‘रेव्ह्युलेशनरी गोवन्स’ (Revolutionary Goans) विद्यापीठात आंदोलन करेल असा इशारा पक्षाचे अध्यक्ष मनोज परब यांनी दिला आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू हरिलाल मेनन यांनी गोव्यातील प्राध्यापकांची भरती निवास प्रमाणपत्राद्वारे होते हे विधान करणे म्हणडे तो गोव्यातील तरुणांचा आणि गोव्यातील लोकांचा अपमान असल्याचा आरोप मनोज परब यांनी पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. यावेळी सांत आंन्द्रेचे आमदार विरेश बोरकर उपस्थित होते.
या मानांकन (रॅकिंग) घसरण्यामागे अनेक कारणे आहेत. ज्यात विद्यापीठाची अंतर्गत अकार्यक्षमता, अंतर्गत संशोधन, ग्रंथालयाचा कमी वापर यांचा समावेश असू शकतो. कोणत्याही अभ्यासाशिवायआणि पुराव्याशिवाय विधान करणे चुकीचे आहे. हे विधान जाणूनबुजून केले आहे. गोवा विद्यापीठाच्या (Goa University) प्रमुख पदांवरील व्यक्ती बाहेरून आलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना विद्यापीठात गोव्याचे लोक नको असल्याने हे असे प्रकार होत असल्याचा आरोप परब यांनी केला.
'या' प्रकरणावर मुख्यमंत्री गप्प का? आरजीचा सवाल
मेनन यांनी एवढे मोठे विधान करून देखील गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यावर गप्प राहतात. स्वयंपूर्ण गोवा म्हणवणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना इशारा द्यायला हवा होता. कदाचित केंद्राकडून बाहेरील व्यक्तींना विद्यापीठाच्या नोकऱ्या देण्याचा आदेश आला असेल. मात्र काहीही झालं तरी आम्ही रहिवासी परवाने जारी करू देणार नाही. जर मेनन यांनी गोव्यातील लोकांची माफी मागितली नाही तर विद्यापीठाविरुद्ध आंदोलन करणारा आरजी हा पहिला पक्ष असेल, अशा इशारा परब यांनी यावेळी दिला.
गोव्यातील लोकांना डावले जातेयः बोरकर
या अर्थसंकल्पात विद्यापीठाला सुविधांसाठी फक्त २०० कोटी रुपये आणि इतर गोष्टींसाठी १०० कोटी रुपये मिळाले आहेत. गोव्यातील लोकांचे पैसे विद्यापीठाला दिले जातात पण तिथे गोव्यातील लोकांना प्राधान्य मिळत नाही. मात्र आता आम्ही आता गप्प बसणार नाही. तुम्हाला धडा शिकवण्याची वेळ आली आहे, असा इशारा बोरकर यांनी दिला.