राजपत्रित अधिकाऱ्याच्या प्रमाणपत्रामुळे अटालाला मिळाले आधार कार्ड!

‘यूआयडीएआय’ची उच्च न्यायालयात माहिती; पुढील सुनावणी १० रोजी


08th July 2025, 05:33 am
राजपत्रित अधिकाऱ्याच्या प्रमाणपत्रामुळे अटालाला मिळाले आधार कार्ड!

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : ड्रग्ज डिलर संशयित यानिव्ह बेनाईम उर्फ अटाला या इस्रायली नागरिकाकडे सापडलेले आधार कार्ड एका राजपत्रित अधिकाऱ्याच्या प्रमाणपत्रामुळेच दिले आहे, अशी माहिती भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (यूआयडीएआय) वकील रवीराज चोडणकर यांनी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाला दिली. दरम्यान, अटालाला मंगळवारपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश न्यायालयाने दिला. पुढील सुनावणी १० जुलै रोजी होणार आहे.
एएनसीच्या पथकाने ४ एप्रिलच्या मध्यरात्री ११.२५ ते ५ एप्रिलच्या पहाटे ३.३० च्या दरम्यान शिवोलीतील अटालाच्या फ्लॅटवर छापा टाकला. पथकाने त्याच्याकडून ७.५० लाखांचे ५० ग्रॅम कोकेन व १.२० लाखांचा १२० ग्रॅम चरस, असा एकूण ८.७० लाखांचा अमलीपदार्थ जप्त केला. या प्रकरणी उपनिरीक्षक दीनदयाळनाथ रेडकर यांनी अटालाविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली होती. एएनसीने अटालाची अधिक चौकशी केली असता, त्याच्याकडे आधार कार्ड सापडले होते. तो बेकायदेशीर वास्तव्य करत असल्याचे समोर आले होते. एएनसीच्या तक्रारीवरून हणजूण पोलिसांनी अटाला, तसेच तो राहत असलेल्या घर मालकाविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई केली.
दरम्यान, अटालाने प्रतिज्ञापत्र दाखल केले नसल्याने त्याला मंगळवारपर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. पुढील सुनावणी १० जुलै रोजी होणार आहे.
न्यायालयाच्या आदेशानंतर यूआयडीएआयची माहिती
हणजूण पोलिसांनी यूआयडीएआयशी संपर्क साधून आधार कार्डविषयी माहिती मागवली होती. ही माहिती देण्यास यूआयडीएआयने नकार दिल्यामुळे पोलिसांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल करून वरील मुद्दा मांडला. याची दखल घेऊन आधार कार्ड कोणत्या आधारावर आणि कोणत्या अधिकृत नोंदणी संस्थेद्वारे प्राप्त झाले, त्याची माहिती असलेली फाईल न्यायालयात सादर करा, असे निर्देश न्यायालयाने यूआयडीएआयला दिले होते. एका राजपत्रित अधिकाऱ्याने अटाला गोव्यात वास्तव्य करत असल्याचे प्रमाणपत्र दिले होते. त्या प्रमाणपत्राच्या आधारे अटालाला आधार कार्ड देण्यात आले, अशी माहिती यूआयडीएआयचे वकील रवीराज चोडणकर यांनी सोमवारी न्यायालयात दिली.