म्हापसा : पर्रा येथे कामगाराचा निर्घृण खून, फरार साथीदारांना घेतले ताब्यात

वादातून उफाळले हिंसक रूप; डोक्यावर, गुप्तांगावर गंभीर वार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
6 hours ago
म्हापसा : पर्रा येथे कामगाराचा निर्घृण खून, फरार साथीदारांना घेतले ताब्यात

म्हापसा : फोंडेकवाडो, पर्रा येथे सुरू असलेल्या एका बांधकाम साईटवरील राहत्या झोपडीत ओडिसाशातील ३५ वर्षीय कामगाराचा निर्घृणरित्या खून करण्यात आल्याची घटना सोमवार दि. ७ रोजी रात्री १० च्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी मयत कामगाराच्या दोघाही संशयितांना अटक केली असून सत्या नाबरांगपुरा (५०) व थाबिर नाबरांगपुरा (३१) अशी या संशयित बाप लेकाची नावे आहेत. त्यांनीच हा खून केल्याचा संशय आहे. मयताची ओळख अद्याप पटलेली नाही. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

साथीदारांनी सदर मयत कामगारावर लोखंडी सळी आणि सुरीच्या सहाय्याने हल्ला करत त्याचा खून केला. तसेच कामगाराच्या डोके, शरीराचे इतर भाग आणि गुप्तगांवर देखील वार केल्याचे उघड झाले आहे. या घटनेत रक्तस्त्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर संशयितांनी पळ काढला.

चार - पाच दिवसांपूर्वी या तिघांना बांधकामस्थळी कामासाठी आणले होते. त्या दिवसापासून मयत आणि संशयित असे तिघेच कामगार त्या झोपडीत राहत होते. काल दुपारपासून संशयित आणि संबंधित कामगारामध्ये बाचाबाची सुरू होती. रात्री बांधकाम प्रकल्प सुपरवायझरने आपल्या एका कामगाराला घटनास्थळी त्या कामगारांना पाहण्यासाठी पाठवले होते. तेव्हा हा खूनाचा प्रकार उघडकीस आला.

झोपडीत मयत कामगार रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला आढळून आला. लगेच त्याने १०८ रुग्णवाहिकेला पाचारण केले. रुग्णवाहिकेतून जखमी कामगाराला म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल केल्यानंतर त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच म्हापसा पोलीस निरीक्षक निखील पालेकर व सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृतदेह गोमेकॉत शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. दरम्यान पोलिसांनी दोघाही संशयितांना ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे

हेही वाचा