३५० कोटींचे कर्ज घेतलेल्या ११२० महिला गटांची प्रभावी कामगिरी; कर्ज फेडण्याचे प्रमाणही उच्च
पणजी : केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करत आहेत. या योजना महिला सशक्तीकरणासह त्यांना सन्मानाचे आयुष्य देत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant ) यांनी केले. मंगळवारी ग्रामीण विकास खात्यातर्फे पणजीत आयोजित अनुभूती या बैठकीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय संयुक्त सचिव श्रुती शरण, सहसचिव डॉ. मोनिका, राज्य सचिव संजय गोयल उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१४ पासून महिला सशक्तीकरणासाठी विविध योजना सुरू केल्या. याद्वारे महिलांचा सहभाग वाढून त्यांचा विकास झाला. मागील ११ वर्षात डबल इंजिन सरकारने जेवढा विकास केला तेवढा ६० वर्षात झाला नव्हता. सरकार केवळ पायाभूत सुविधांचा विकास करत आहेच, शिवाय मनुष्यबळ विकासही करत आहे. गोवा सरकारने केंद्राच्या १३ फ्लॅग शिप प्रकल्पांपैकी ८० प्रकल्प हे १०० टक्के पूर्ण केले आहेत. असे करण्यात गोवा देशात आघाडीवर आहे.
राज्यात ३२५० महिला स्वयंसहाय्यता गटांपैकी ११२० गटांनी सुमारे ३५० कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. अन्य गटांनी बँकासोबत (Bank) लिंकेज केल्यास त्यांना देखील कर्ज मिळू शकते. राज्यातील महिला स्वयं सहाय्यता गटांनी ९०० कोटी रुपयांपर्यंत कर्ज घेण्यासाठी प्रयत्न करावेत. पुरुष गटांच्या तुलनेत महिला गटांची कर्ज फेडण्याची टक्केवारी देखील अधिक आहे. यामुळे बँका देखील त्यांना लगेच कर्ज देतात. गोव्यात राष्ट्रीय ग्रामीण विकास मिशन अधिक प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याची माहिती सावंत यांनी दिली.
गोव्यात स्पिरूच्यअल पर्यटन
गोवा आतापर्यंत केवळ 'सन, सँड आणि सी' या तीन 'एस'साठी ओळखला जात होता. आता यामध्ये भर पडली आहे. गोव्यात स्पिरूच्यअल पर्यटन देखील सुरू झाले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.