सत्ताधाऱ्यांवर टीका, जनतेला एकत्र येण्याचे आवाहन
वरळीः महाराष्ट्रात हिंदी सक्तीच्या निर्णयाला झालेल्या विरोधानंतर महाराष्ट्र सरकारने हा निर्णय रद्द केला. या विरोधात राज आणि उद्धव ठाकरे एकत्र मोर्चा काढणार होते. पण निर्णय रद्द झाल्यानंतर मोर्चाऐवजी त्यांनी वरळी येथे विजयी मेळावा आयोजित केला होता. अखेर आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी अनेक वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर येत मराठी अस्मितेचा जागर केला आणि सत्ताधारी महायुती सरकारला थेट आव्हान दिले.
वरळीतील एनएससीआय डोममध्ये आयोजित मराठी विजयी मेळाव्यात ठाकरे बंधूंनी एकजुटीचं प्रदर्शन करत मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या हक्कांसाठी लढण्याचा निर्धार जाहीर केला. तसेच 'एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी' अशा शब्दात उद्धव ठाकरेंकडून मनसे-शिवसेना युतीचे संकेतही दिले गेले. ही घटना आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांसाठी आव्हान ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मराठीचा अपमान करणाऱ्यांना जनता धडा शिकवेलः उद्धव ठाकरे
या सभेत उद्धव ठाकरे (UddhavThackeray) यांनी सत्ताधारी महायुतीवर जोरदार टीका केली. "मराठी भाषेला कमकुवत करण्याचा डाव होता, पण आमच्या एकजुटीने तो हाणून पाडला," असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना, "महाराष्ट्रातून उद्योगधंदे पळवणाऱ्यांना आणि मराठी भाषेचा अपमान करणाऱ्यांना आता जनता धडा शिकवेल," असा इशारा दिला. मराठी सक्तीच्या मुद्द्यावर काही जणांनी कोर्टात धाव घेतली असली, तरी मराठी जनतेचा आवाज दडपता येणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यादरम्यान त्यांनी एकनाथ शिंदे यांनाही टिकेचे लक्ष्य केले.
हिब्रू भाषेत शिकेन, मराठीचा कडवट अभिमान बाळगेनः राज ठाकरे
तर मेळाव्यात राज ठाकरेंनी (RajThackeray) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह (CM Devendra Phadanvis) सत्ताधाऱ्यांवर टिकेची झोड उठवली. दादा भुसे मराठीत शिकून शिक्षणमंत्री झाले, देवेंद्र फडणवीस इंग्रजीत शिकून मुख्यमंत्री झाले, मुळात कोण कोणत्या भाषेत शिकतो त्याचा काय संबंध? हिंदीचा आदेश मागे घेतल्यानंतर हे प्रकरण वेगळ्या ठिकाणी वळवायचा प्रयत्न झाला. ठाकरेंची मुलं इंग्रजी माध्यमात शिकली, असा आरोप अनेकांनी केला. पण कोणा कोणाची मुलं परदेशात शिकतायत याच्या याद्या आमच्याकडे असल्याचा पलटवार राज ठाकरेंनी केला. आम्ही मराठी मीडियममध्ये शिकलो. आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील श्रीकांत ठाकरे इंग्रजी मीडियमममध्ये शिकलेत. या दोघांवर मराठीबद्दल शंका घेऊ शकता काय़? लालकृष्ण अडवाणी, ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घ्यायची का? कॉन्वेंट स्कूलमध्ये शिकलेत तामिळ, तेलगुच्या प्रश्नावर दक्षिण भारतात उभा राहतात. त्यांना कुठं शिकलात विचारत नाहीत. हिब्रू भाषेत शिकेन आणि मराठीचा कडवट अभिमान बाळगेन, असं प्रत्युत्तर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलं.
कार्यक्रमाला फिल्मी टच
अभिनेते अजित भुरे यांनी मेळाव्याचं सूत्रसंचालन केलं. यावेळी रासपचे महादेव जानकर, शेकापचे जयंत पाटीलही मेळाव्याला उपस्थित होते. राजकीय कार्यक्रमाला फिल्मी टच दिल्याचं पाहायला मिळालं. राज आणि उद्धव ठाकरेंचे आगमन होण्यापूर्वी डोममध्ये अंधार करण्यात आला होता. यानंतर मोबाईलचे हजारो लाईट पेटले होते. व्यासपीठावर येताच राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंना आलिंगन दिलं. दोघांनी एकत्रितपणे शिवाजी महाराजांना हार घातला.