टाऊट्स, रेंट-अ-कारमुळे व्यवसायावर परिणाम!

दाबोळी विमानतळावरील टॅक्सीचालकांचे वास्को पोलिसांना गाऱ्हाणे

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
08th July, 11:51 pm
टाऊट्स, रेंट-अ-कारमुळे व्यवसायावर परिणाम!

वास्को : दाबोळी विमानतळावरील टाऊट्स व रेंट-अ-कारमुळे आमच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. पोलिसांना अनेकदा निवेदने देऊनही, विनंत्या करूनही काहीच उपयोग झाला नसल्याचा दावा दाबोळी विमानतळावरील काळ्या-पिवळ्या टॅक्सीचालकाच्या युनायटेड टॅक्सीमेन्स असोसिएशनाने केला आहे. याप्रकरणी त्वरित कारवाई न झाल्यास आम्ही रस्त्यावर येऊ, असा इशारा देण्यात आला. वास्कोचे उपअधीक्षक गुरुदास कदम यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. याप्रकरणी सराईतांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, टाऊट्स व रेंट-अ-कारवाल्याविरोधात कारवाई न झाल्यास बुधवारपासून आम्हीही आमची वाहने वाटेल तेथे पार्क करू, असा इशारा संघटनेचे सरचिटणीस प्रसाद प्रभुगावकर यांनी दिला आहे. या टाऊट्स व रेंट-अ-कारप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
दरम्यान, कदम मंगळवारी पाहणी करणार आहेत, याची माहिती टाऊट्स व रेंट-अ-कारवाल्यांना मिळाल्याने ते गायब झाले होते. आम्ही आमच्या टॅक्सी उभ्या करण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाला १ लाख २० हजार रुपये देतो. त्या ठिकाणी आम्हाला ५० टॅक्सी उभ्या करता येतात. तथापी रेंट-अ- कारवाले एकही पैसा न देता आपली वाहने वाटेल तेथे उभी करतात. कोणीही त्याच्याविरोधात कारवाई करीत नाही, हा कोणता न्याय असा सवाल संघटनेचे अध्यक्ष शैलेश मयेकर यांनी उपस्थित केला. रेंट-अ- कारवाल्याविरोधात कारवाई झाली नाही, तर आम्ही आमच्या टॅक्सी वाटेल तेथे उभ्या करू, असा इशारा देण्यात आला.
टॅक्सीचालक हवालदिल
दाबोळी विमानतळावर युनायटेड टॅक्सीमेन्स असोसिएशनचा काउंटर आहे आणि त्यांचे सुमारे ३५० सदस्य आहेत. पूर्वी त्यांना दिवसाला दोन भाडे मिळत होती, परंतु आता काही विमान कंपन्यांनी आपली विमाने मोपाकडे वळवल्यामुळे आणि विमानतळावर टाऊट्स व रेंट-अ-कारवाल्यांचा सुळसुळाट झाल्यामुळे दिवसाला एकही भाडे मिळणे कठीण झाले आहे, असे संघटनेने म्हटले आहे. टाऊट्स आणि रेंट-अ-कारवाल्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस, वाहतूक पोलीस, आणि आरटीओ यांसारख्या संबंधित यंत्रणा अपयशी ठरल्या आहेत, असेही त्यांचे म्हणणे आहे.       

हेही वाचा