गोवा : वाहन स्क्रॅप मेळाव्याला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
10th July, 04:24 pm
गोवा : वाहन स्क्रॅप मेळाव्याला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद

पणजी : गोवा पोलिस राखीव दलाच्या कार्यालयात गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाने आयोजित केलेल्या वाहन स्क्रॅप मेळाव्याला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यात सुमारे १७० गाड्या लिलावासाठी ठेवण्यात आल्या होत्या.  त्यातील १२८ गाड्या १५ किंवा त्याहून जास्त जुन्या तर ४२ गाड्या १५ वर्षांखालील होत्या. या ४२ गाड्या सर्वसामान्य नागरिकांसाठी लिलाव प्रक्रियेद्वारे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या.

या वाहनांसाठी देशभरातून अधिकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधा  (आरव्हीएसएफ) असलेल्या ६ बोलिदारांनी बोली  लावली. प्रत्येक वाहनासाठी लॉट नंबरनुसार आरंभिक किंमत निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर सर्वाधिक बोली लावणाऱ्याला वाहन देण्यात आले. लिलावाची प्रक्रिया संध्याकाळी ३.३० पर्यंत पार पडली.

टोयोटा इनोव्हा, रेनॉ डस्टर, होंडा सिटी, मारुती एसएक्स४, फॉक्सवॅगन वेंटो आणि फोर्ड फिएस्टा या गाड्यांच्या सुरुवातीच्या किमती २४ हजार ते दीड लाख रुपयांच्या दरम्यान होत्या. दुचाकींमध्ये स्प्लेंडर आणि पल्सरची किमान किंमत ४ हजार रुपये होती.

मुख्यमंत्र्यांची कार लिलावात गेली ३.२० लाखांना!

माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या वापरातील महिंद्रा एक्सयूव्ही ३०० याशासकीय  वाहनालाही लिलावासाठी ठेवण्यात आले होते. ही गाडी सामान्य प्रशासन खात्याच्या नावे असून या वाहनास अद्याप १५ वर्षे पूर्ण झाली नसल्याने ती विक्रीसाठी उपलब्ध करण्यात होती. या गाडीची किमान बोली किंमत १.२० लाख रुपये होती. नीलेश देसाई यांनी सर्वाधिक ३.२० लाख रुपये बोली लावून हे वाहन विकत घेतले.

हेही वाचा