दक्षिण गोव्यात सहा महिन्यांत ६७ अपघाती मृत्यू

एकूण ६३३ अपघातांची नोंद : गंभीर जखमी होण्याची ५८ प्रकरणे

Story: अजय लाड । गोवन वार्ता |
11th July, 04:04 pm
दक्षिण गोव्यात सहा महिन्यांत ६७ अपघाती मृत्यू

मडगाव : दक्षिण गोव्यातील जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत एकूण ६३३ प्रकरणांची नोंद दक्षिण गोवा जिल्हा पोलिसांकडे आहे. यातील ६७ अपघातात चालक किंवा वाहकांचा अपघाती मृत्यू झाला आहे. रस्ता सुरक्षा नियमांबाबत जागृती केली जात असतानाही ही संख्या चिंताजनक आहे.

मागील सहा महिन्यात राज्यातील अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. रस्ता सुरक्षा नियमांचे पालन न करणे, हेल्मेट परिधान न करणे, अतिवेगाने गाडी चालवणे, मद्यपान करून गाडी चालवण्यासह पर्यटकांकडून 'रेंट अ कार' व 'रेंट अ बाईक'चे अपघात होण्याच्या संख्येत वाढ होत आहेत.
    
दक्षिण गोव्याचा विचार करता दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक टिकमसिंग वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी जानेवारीपासून जून महिना अखेरपर्यंतच्या कालावधीत दक्षिण गोव्यातील विविध पोलिस ठाण्यात अपघातांची ६३३ प्रकरणे नोंद आहेत. यातील ६७ अपघातांमध्ये चालक किंवा वाहकांचा मृत्यू झालेला आहे. अपघातात चालकाला गंभीर जखमी होण्याची ५८ प्रकरणे नोंद आहेत. किरकोळ दुखापत झाल्याच्या १५५ अपघातांची नोंद आहे. तर अपघात होऊनही दुखापत न झाल्याची ३५३ प्रकरणे नोंद असल्याचे सांगितले.

नियम पाळणे गरजेचे : शिरवईकर
राज्यातील पोलिसांकडून रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करण्यासाठी आवश्यक जनजागृती केली जात आहे. जनजागृती, दंडात्मक कारवाई केली जात आहे. गोव्यातील रस्ते त्यामानाने खूप चांगले आहेत, पण खराब रस्त्यावर गाडी चालवतानाही चालकाने काळजी घेणे गरजेचे आहे. प्रत्येकाने वाहतूक सुरक्षा नियमांचे पालन केल्यास रस्ते अपघात कमी होतील, असे वाहतूक पोलीस अधीक्षक प्रबोध शिरवईक यांनी सांगितले.

हेही वाचा