कोमुनिदाद जमिनीवर अनधिकृत रस्ते, शासनाचे आदेश झुगारून फनेल झोनमध्ये वेगाने काम सुरू
वास्कोः दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या फनेल झोनमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर बांधकामांबाबतचा मुद्दा गेली बरेच वर्ष गाजत आहे. या भागातील बेकायदेशीर कामे थांबवण्याची मागणी याआधीही केली गेली होती. मात्र आता पुन्हा हा विषय समोर आला आहे. येथील नागरिकांनी आणि ऑल गोवा एक्स्कॅव्हेटर ओनर्स असोसिएशन (AGEOA) च्या कार्यकर्त्यांनी थेट पंतप्रधान कार्यालयाला (PMO) पत्र लिहून दाबोळी गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या फनेल झोनमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर बांधकामे थांबवण्याची मागणी केली आहे.
फनेल झोन म्हणजे विमानतळाच्या धावपट्ट्या आणि प्रवेश मार्गांभोवतीचे हवाई क्षेत्र. टेक-ऑफ आणि लँडिंगदरम्यान विमानतळांभोवती उड्डाण सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी हा झोन असतो. या 'फनेल झोन' मध्ये म्हणजेच 'विमानांच्या ये-जा करण्याच्या मार्गात एकही उंच इमारत नसावी,' यावर भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे (एएआय) कडक नियम आहेत.
दरम्यान दाबोळीतील नागरिकांचा असा दावा आहे की, या विमानतळाच्या फनेल झोनमध्ये जर बांधकामे आणि निवासी इमारती उभ्या राहिल्या तर, सार्वजनिक सुरक्षा आणि उड्डाण ऑपरेशन्स दोन्ही धोक्यात येणार आहे. माध्यमांशी बोलताना, AGEOA चे अध्यक्ष अविनाश भोबे यांनी या प्रकाराबद्दल असे सांगितले की, काम थांबवण्याचा आदेश असूनही, अधिकारी दिल्लीस्थित एका बड्या व्यक्तीच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या बांधकामाला पाठिंबा देत आहेत. आम्ही अनेक वेळा या बेकायदेशीर बाबींकडे शासनाचे लक्ष वेधले आहे, अधिकाऱ्यांना पत्रे लिहिली आहेत. यावर कारवाई म्हणून प्रशासनाने काम थांबवण्याचे आदेशही दिले आहेत. पण प्रकल्पातील काही व्यक्ती अधिकाऱ्यांशी भेटतात आणि तातडीने सदर काम थांबवण्याचे आदेश रद्द केले जातात. आता यावर शेवटचा उपाय म्हणून, आम्ही पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालय, गृह मंत्रालय आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे.
जनहित याचिका दाखल करणार
पहिल्या टप्प्यात १२० चौरस मीटरचे ३२० भूखंडावर बांधकामे होणार असून त्यामुळे कचरा समस्या, प्रदूषणासारख्या समस्या निर्माण होणार आहेत. प्रत्येक वेळी जेव्हा आम्ही आक्षेप घेतो तेव्हा अधिकारी आम्हाला शांत करण्यासाठी काम थांबवण्याचे आदेश जारी करतात. परंतु प्रत्यक्षात मात्र साईटवरील मशीनरीची संख्या दरवेळी वाढत आहे. त्यामुळेच आता आम्ही जनहित याचिका दाखल करणार असल्याचे AGEOA चे अध्यक्ष अविनाश भोबे म्हणाले.
शेत जमिनीत ८ जेसीबीद्वारा अनधिकृत बांधकाम सुरू
सांकवाळ कोमुनिदादचे जयेश फडते म्हणाले, सदर जमीन कोमुनिदादची असून तिचा शेतीसाठी वापर करणे आवश्यक आहे. मात्र या जमिनीवर अनधिकृत रस्ते, बांधकाम आणि बांधकाम कामांसाठी यंत्रसामग्रीचा वापर होत आहे. आमच्या कोमुनिदाद जमिनीतून त्यांनी रस्ता कसा बनवला हे आम्हाला माहित नाही. सध्या येथे ८ जेसीबी आणि इतर यंत्रसामग्रीने काम सुरू आहे. मी कोमुनिदादच्या बाजूने हा मुद्दा न्यायालयात नेणार आहे.
सरकार अपघात होण्याची वाट पाहत आहेत का?
सामाजिक कार्यकर्ते जॉन फिलिप परेरा यांनीही विमानतळाच्या फनेल झोनजवळ सुरू असलेल्या बांधकामामुळे निर्माण होणाऱ्या गंभीर धोक्यांबद्दल इशारा देत सरकारला हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे. सरकारने अहमदाबाद हवाई आपत्तीपासून धडा घेतला पाहिजे होता, बांधकाम स्थळ विमानतळाच्या लँडिंग स्ट्रिपपासून फक्त काहीशे मीटर अंतरावर आहे. विमानतळ प्राधिकरण किंवा नौदलाने या समस्येची दखल घेऊन येथील कामाची पाहणी करायला हवी होती. मात्र असे न करता ते अपघात होण्याची वाट पाहत आहेत का असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
इमारतींची उंची नियंत्रित करण्याबाबत...
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे विमान (सुरक्षा) सुधारणा नियम २०२४ मध्ये, विमान सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी विमानतळांभोवती इमारतींची उंची नियंत्रित करण्याबाबत स्पष्टता देण्यात आली आहे. या नियमांचे उद्दिष्ट इमारतींना टेकऑफ आणि लँडिंग मार्ग आणि इतर विमान ऑपरेशन्समध्ये अडथळा बनण्यापासून रोखणे हे आहे. धावपट्टीच्या १५० मीटरच्या आत कोणत्याही बांधकामाला परवानगी नाही. तसंच विमानतळ (Airport) ऑपरेशन्ससाठी १५०-५०० मीटर जागा मर्यादित आहे. अंतरानुसार उंची वाढू शकते, म्हणजेच धावपट्टीपासून जितकी दूर असेल तितक्या उंच इमारती असू शकतात, परंतु उंची त्या रेषेत नसावी. टेक-ऑफ आणि लँडिंग मार्गांची उंची मर्यादा वेगवेगळी आहे. धावपट्टीपासून प्रत्येक सात मीटर अंतरावर उंचीमध्ये एक मीटर वाढ करण्याची परवानगी आहे. टेक-ऑफ आणि लँडिंग मार्ग वगळता उंचीमध्ये प्रत्येक २० मीटरसाठी एक मीटर वाढ आहे.