पाच निविदांपैकी तीन सोमवारपर्यंत, उर्वरित पुढील आठवड्यात; युद्धपातळीवर कामाची तयारी
मडगाव : मडगाव रवींद्र भवन इमारतीच्या दुरूस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून वेगवेगळ्या पाच कामांच्या निविदा काढण्यात येणार आहेत. त्यातील तीन निविदा सोमवारपर्यंत तर इतर निविदा पुढील आठवड्यात जारी होतील. मुख्यमंत्र्यांनी कामांना मंजुरी देत युद्धपातळीवर काम हाती घेण्याचे निर्देश दिले आहे, अशी माहिती आमदार दिगंबर कामत यांनी दिली.
मडगाव रवींद्र भवनचे (Ravindra Bhavan, Margao) सभागृह सध्या बंदावस्थेत आहे. सभागृह बंद झाल्यानंतर अजूनही कामांना सुरुवात झालेली नाही, यासाठी कला राखण मांडच्या पदाधिकार्यांनी रवींद्र भवन अध्यक्ष राजेंद्र तालक यांची भेट घेतली. त्यानंतर कामाबाबत अध्यक्षांनाही योग्य माहिती नसल्याने कलाकारांना कला सादरीकरणासाठी आणखी किती वेळ वाट पाहावी लागणार असा सवाल केला होता. याबाबत मडगावचे आमदार कामत यांना विचारणा केली असता सोमवारपर्यंत तीन निविदा जारी केली जातील, असे सांगितले.
आमदार कामत यांनी सांगितले की, रवींद्र भवन मडगावच्या दुरूस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम खाते करत असून या कामांच्या पाच निविदा काढण्यात येणार आहेत. त्यातील तीन निविदांसंदर्भातील फाईल्स मुख्यमंत्र्यांकडे (CM Pramod Sawant) पोहोचलेल्या आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सदरचे काम हे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
इमारतीचा ताबा 'साबांखा'कडे तर व्यवस्थापन कला व संस्कृती खात्याकडे
मडगाव रवींद्र भवनाच्या उभारणीला १७ वर्षे झाल्यानंतरही ही इमारत सार्वजनिक बांधकाम खात्याकडून हस्तांतरीत करण्यात आली नाही, याबाबत आपणास काहीही माहिती नाही. रवींद्र भवनची नव्यानेच बांधणी झालेली असताना आपण अध्यक्ष होतो. हस्तांतरणासाठीची अनेक बाबी असतात, प्रकल्प पूर्ण होणे व त्यानंतरही अनेक गोष्टी असतात. पण राज्यातील रवींद्र भवनाच्या कोणत्याही इमारतीचा ताबा सार्वजनिक बांधकाम खात्याकडून हस्तांतरित करण्यात आला नाही, पण या इमारतीतील व्यवस्थापन हे कला व संस्कृती खात्याच्या अखत्यारीत आहे, असे आमदार दिगंबर कामत यांनी सांगितले.
इफ्फीपूर्वीच कामे पूर्ण होणार
दुरुस्तीच्या कामांच्या फाईल्स मुख्यमंत्र्यांकडून तत्काळ काम हाती घेण्याची टिपणी करून पुढे पाठवण्यात आल्या आहेत. प्रशासकीय मंजुरी मिळाल्यावर सोमवारपर्यंत तीन निविदा जारी केल्या जातील. निविदा जारी झाल्यानंतर कामे कधी पूर्ण होणार याची योग्य माहिती मिळेल. इफ्फीपूर्वीच ही कामे पूर्ण होतील, असेही आमदार कामत यांनी स्पष्ट केले.