बार्देश : राज्य सरकारद्वारे स्मशानभूमीसाठी संपादित जागेतील भूखंडाची ९.७५ लाखांना विक्री

पैसे देऊनही २७० चौरस मीटर भूखंडाचे हस्तांतरण न झाल्याने फिर्यादीने दाखल केली होती तक्रार

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
11th July, 04:51 pm
बार्देश : राज्य सरकारद्वारे स्मशानभूमीसाठी संपादित जागेतील भूखंडाची ९.७५ लाखांना विक्री

म्हापसा  : खडपावाडा-कुचेली, म्हापसा येथील राज्य सरकारने स्मशानभूमीसाठी संपादीत केलेल्या जागेतील भूखंड विकून ९.७५ लाख रुपये रकमेची फसवणूक केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी राजा अँथनी, सुमित फडते व राजू मांद्रेकर (रा. सर्व कुचेली) या तिघांना अटक केली आहे. 

  हा फसवणूकीचा प्रकार २०२४ मध्ये घडला होता. याप्रकरणी फिर्यादी रिंकी झा (रा. कुचेली) व इतरांनी म्हापसा पोलिसांत तक्रार दाखल केली होती. संशयितांनी या सरकारी भूखंडातील फिर्यादींना २७० चौरस मीटर जागा विकली होती. या बदलात संशयितांनी ९ लाख ७५ हजार रुपये रक्कम घेतली होती. परंतु संशयितांनी ही जागा फिर्यादींच्या नावे हस्तांतर करुन दिली नाही. आपली फसवणूक झाल्याचे दिसून आल्यावर त्यांनी पोलिसांत धाव घेतली.

 पोलिसांनी गुन्हा नोंद करून शुक्रवारी ११ रोजी पहाटेच्या सुमारास वरील तिन्ही संशयित आरोपींना पकडून अटक केली. दरम्यान, म्हापसा शहर पीटी शीट क्रमांक १, चलता क्रमांक १०/३ व पीटी शीट क्रमांक २, चलता क्रमांक ११/१ या जमिनीतील सुमारे ३० हजार चौ. मी. जागेवर अतिक्रमण करून एकूण ३६ घरे बेकायदा पध्दतीने बांधली होती. ही जमीन सरकारने सर्वधर्मिय स्मशानभूमीसाठी संपादीत केली होती. 

 हा सरकारी जागेतील अतिक्रमणाचा प्रकार उघडकीस आल्यानंतर उत्तर गोवा कोमुनिदाद प्रशासकांच्या अहवालानुसार बार्देश उपजिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित घर मालकांना नोटिस बजावली होती. शिवाय १२ नोव्हेंबर २०२४ ते २ जानेवारी २०२५ दरम्यान सर्व घरे प्रशासनाने जमीनदोस्त केली होती. दरम्यान, सुश्मिता हरमलकर (वेर्ला- काणका) व सहकाऱ्यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी शकील शेख, रवी चव्हाण आणि रमेश राव या तिघांना अटक केली होती.

तिघा संशयितांनी गुन्हेगारी कट रचला व स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी फिर्यादी व इतर अनेक व्यक्तींना कुचेली कोमुनिदाद जागेतील भूखंड विकत घेण्यास प्रवृत्त केले. तसेच भूखंडाचे हक्क फिर्यादींच्या नावावर हस्तांतरित करण्यासाठी कायदेशीर औपचारिकता पूर्ण करण्याची हमी देत फिर्यादी आणि इतरांना फसवून एकूण ३८.४९ लाख रूपये उकळले होते.


हेही वाचा