गोवा : निवृत्तीनंतर अंगणवाडी सेविका, मदतनीसांना आर्थिक मदत

६२ वर्षे पूर्ण केलेल्या सेविकांना ५ लाख, मदतनीसांना ३ लाख

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
11th July, 12:31 am
गोवा : निवृत्तीनंतर अंगणवाडी सेविका, मदतनीसांना आर्थिक मदत


पणजी :
मागील वर्षी महिला आणि बालकल्याण खात्याने अंगणवाडी सेविका, मदतनीसांसाठीचे निवृत्ती वय ६० वरून वाढवून ६२ वर्षे केले होते. यानंतर आता खात्याने नवीन निवृत्ती योजना अधिसूचित केली आहे. यानुसार ६२ वर्षे पूर्ण केलेल्या सेविकांना ५ लाख रुपये, तर मदतनीसांना ३ लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. याशिवाय स्वेच्छा निवृत्ती अंतर्गत (व्हीआरएस) २५ वर्षे काम केलेल्या सेविका, मदतनीसांना अनुक्रमे ५ लाख व ३ लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे.
नव्या योजनेनुसार ६२ वर्षे निवृत्तीचे वय १ मे २०२४ पासून लागू होणार आहे. ६० वर्षांनंतर कर्मचाऱ्यांना शासकीय वैद्यकीय इस्पितळातून तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र द्यावे लागेल. व्हीआरएस अंतर्गत निवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांची आगाऊ सूचना (नोटीस) देणे आवश्यक आहे. यानंतर महिला आणि बालकल्याण खात्याच्या संचालकांनी याला मंजुरी देणे आवश्यक आहे. वैद्यकीय कारणांसाठी व्हीआरएस घेत असल्यास आणि कर्मचाऱ्याने विनंती केल्यास त्यास नोटीस कालावधी असणार नाही. निवृत्ती योजना घेतलेल्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना ही रक्कम देण्यात येणार आहे.

बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याची भूमिका...
अंगणवाडी मदतनीसला सेविका म्हणून बढती मिळाल्यास निवृत्ती योजनेसाठी तिचा मदतनीस म्हणून काम केलेला कालावधी गृहित धरण्यात येणार आहे. बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याला सेविका आणि मदतनीस यांची माहिती, त्यांच्या वारसांची नावे आदी अद्ययावत करून दर महिन्याला खात्याला द्यावी लागणार आहे. कर्मचारी निवृत्त होण्याच्या एक महिना आधी खात्याला कळवावे लागेल. तसेच खात्याला एक महिना किंवा त्याआधी दावा निकाली काढावे लागणार आहेत. नव्या योजनेत वेळोवेळी बदल करण्याचे अधिकार खात्याकडे असल्याचे अधिसूचनेत स्पष्ट केले आहे.      

हेही वाचा