मार्केटातील मासे विक्रेत्यांकडून समाधान, ग्राहक नाराज
वास्को : खारीवाडा येथे घाऊक मासेविक्रीला मार्केटमधील मासळी विक्रेत्यांनी हरकत घेतल्यावर तेथे मासळी विक्री होऊ नये यासाठी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे मार्केटातील मासे विक्रेत्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र, बऱ्याच ग्राहकांनी नापसंती व्यक्त केली.
येथील मासे मार्केटच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. येणाऱ्या दिवसांत सदर मासे मार्केटचे उद्घाटन होणार आहे. तथापी खारीवाडा येथील घाऊक मासे विक्री बंद करावी. अन्यथा आम्ही त्या नवीन मार्केटमध्ये मासे विक्री न करता रस्त्यावरच मासे विक्री करू, असा इशारा मार्केटमधील विक्रेत्यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता. त्यामुळे खारीवाडा येथील त्या विक्रेत्यांकडून होणारी मासे विक्री पोलिसांच्या सहाय्याने बंद करण्यात आली आहे. गेले काही दिवस तेथे चार- पाच पोलीस तैनात असतात. ते तेथे मासे विक्री होणार नाही यासाठी दक्षता घेतात. मात्र, त्याठिकाणी मासे विक्री बंद करण्यात आल्याने ग्राहकांनी आश्र्चर्य व्यक्त केले आहे. तेथे स्वस्त दरात व वजन पद्धतीने मासे विक्री होत असल्याने ग्राहक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. लहान- मोठे मासे मिळत असल्याने ग्राहकांची मोठी सोय होत असे. त्या विक्रेत्यांच्या मते ते घाऊक दराने मासे विक्री करत नाहीत. ते वाटा घालण्याऐवजी वजनाने ग्राहकांना मासे विक्री करतात. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होत नाही.
खारीवाडा येथे घाऊक मासे विक्री होत असल्याने मार्केटात मासे विकत घेण्यासाठी ग्राहक फिरकत नाहीत. आमच्या व्यवसायावर यामुळे मोठा परिणाम झाल्याचा दावा मार्केटातील मासे विक्रेते करतात.
पोलीस तैनातीमुळे मासेविक्री ठप्प
यापूर्वीही खारीवाडा येथील घाऊक मासे विक्रेत्यांविरोधात कारवाया झाल्या होत्या. तथापी काही दिवसांनंतर तेथे पुन्हा मासे विक्री सुरू झाली होती. यावेळी तेथे पोलीस तैनात करण्यात आल्याने गेल्या काही दिवसांपासून तेथील मासे विक्री पूर्णपणे ठप्प झाली आहे.