उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष शंकर चोडणकरांचा राजीनामा

धाकू मडकईकर होतील नवे अध्यक्ष

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
11th July, 05:11 pm
उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष शंकर चोडणकरांचा राजीनामा

पणजी : उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष शंकर चोडणकर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षपद रिक्त झाले आहे. सेंट लॉरेन्स जिल्हा पंचायतीचे प्रतिनिधीत्व करणारे धाकू मडकईकर यांची उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षपदी निवड जवळ जवळ निश्चित आहे.

शंकर चोडणकर यांनी राजीनामा दिल्याच्या वृत्तास पंचायत संचालकांनी दुजोरा दिला. मये जिल्हा पंचायत मतदारसंघातून निवडून आलेले शंकर चोडणकर हे गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अध्यक्ष झाले होते. पक्षाच्या सूचनेप्रमाणे त्यांनी राजीनामा दिला, अशी माहिती सूत्रांनी दिली.

डिसेंबर २०२० मध्ये निवडणूक झाल्यानंतर सर्वप्रथम सुकूरचे जिल्हा पंचायत सदस्य कार्तिक कुडणेकर हे उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष झाले. जवळपास १ वर्ष २ महिने ते अध्यक्ष होते. यानंतर सिद्धेश श्रीपाद नाईक (खोर्ली) यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी आली. ते अडीच वर्षे अध्यक्ष होते. सिद्धेश नाईक यांच्यानंतर मयेचे जिल्हा पंचायत सदस्य शंकर चोडणकर यांची गेल्या सप्टेंबरमध्ये अध्यक्षपदी निवड झाली. त्यांनी राजीनामा दिल्याने आता नवीन व्यक्तीची निवड होणार आहे.

सेंट लॉरेन्स मतदारसंघाचे जिल्हा पंचायत सदस्य धाकू मडकईकर हे ज्येष्ट सदस्य आहेत. त्यांची निवड निश्चित आहे. शंकर चोडणकर यांनी पक्षाच्या सूचनेनुसार अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे. त्यांची निवड झाली तेव्हाच तत्कालीन प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी धाकू मडकईकर यांना संधी मिळायला हवी, अशी सूचना केली होती. ज्येष्ठ सदस्य असल्याने अध्यक्ष म्हणून मलाच संधी मिळेल, असा विश्वास धाकू मडकईकर यांनी व्यक्त केला आहे.

नवीन अध्यक्षांची निवड करण्यासाठी पक्षाची बैठक होईल. नवीन अध्यक्षाबाबत पक्ष निर्णय घेईल, असे माजी अध्यक्ष सिद्धेश नाईक यांनी सांगितले. 

हेही वाचा