मगोच्या केंद्रीय समिती सदस्यांच्या विश्वास
पणजी : 'मगोचे ज्येष्ठ नेते सुदीन ढवळीकर हे बरीच वर्षे आमदार आहेत. त्यांचे मंत्रिपद काढून आमदार जीत आरोलकर यांना मुख्यमंत्री मंत्रिपद देतील असे आम्हाला वाटत नाही,' असे मत मगोचे खजिनदार अनंत नाईक यांनी व्यक्त केले आहे. मगोला यापुढे मंत्रिपद मिळणार नाही, या वक्तव्याचा मगोच्या केंद्रीय समिती सदस्यांनी पत्रकार परिषदेत निषेध केला. यावेळी मडकई मतदारसंघातील आजी, माजी जिल्हा पंचायत सदस्य उपस्थित होते.
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे कार्य राज्यात बरीच वर्षे सुरू आहे. आता सुद्धा सर्व मतदारसंघात कार्य सुरू आहे. वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी तर मडकई मतदारसंघासह इतर मतदारसंघातही कार्य केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना मंत्रिपद देण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे मगोला मंत्रिपद मिळणार नाही, हे विजय सरदेसाई यांचे वक्तव्य अयोग्य असून मगो पक्ष त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतो, असे बांदोडाचे सरपंच व मगोचे सदस्य रामचंद्र नाईक म्हणाले.
भंडारी समाजातही काही नेते फूट घालण्याचा प्रयत्न करत आहेत. सुदीन ढवळीकर यांनी भंडारी समाजासह सर्व समाजासाठी कार्य केलेले आहे. राजकारणात समाजाला महत्त्व असत नाही, असे रामचंद्र नाईक म्हणाले.
जीतला मंत्रिपद दिल्यास स्वागत
मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांना मंत्रिपद दिल्यास मगो पक्ष त्याचे स्वागत करेल. जीत आरोलकर हे मगोचे तडफदार आमदार असून येत्या निवडणुकीत मगो उमेदवारीवर त्यांचा विजय निश्चित आहे. मगोचा सरकारात एक मंत्री आहे. आणखी एक मंत्रिपद मिळाल्यास त्याचा पक्षाला लाभ होईल, असे खजिनदार अनंत नाईक म्हणाले.
पहिल्या टर्ममध्ये सुदिन, दीपकही मंत्री नव्हते
मगोच्या आमदाराला पहिल्या टर्ममध्ये मंत्रिपद मिळणार नाही, असा ठराव मगो पक्षाने बऱ्याच पूर्वी घेतला आहे. सुदीन ढवळीकर व अध्यक्ष दीपक ढवळीकर हे सुद्धा आमदारकीच्या पहिल्या टर्ममध्ये मंत्री नव्हते, असे कार्यकारी अध्यक्ष प्रताप फडते यांनी यावेळी स्पष्ट केले.