सात संशयास्पद व्यवहार झाल्याचे उघड; रेकॉर्ड नष्ट करण्याचाही केला प्रयत्न
पणजी : भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) अधिकाऱ्यावर तब्बल ४३.८० लाख रुपयांची अफरातफर केल्याप्रकरणी केंद्रीय गुप्तचर विभागाच्या (सीबीआय) लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने गुन्हा दाखल केला आहे. संबंधित प्रकरणात सात संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याचेही तपासात उघड झाले आहे.
गजेंद्रनाथ रतनबोली असे या संशयित अधिकाऱ्याचे नाव असून, त्यांनी एलआयसीच्या पेंशन आणि ग्रुप स्कीम विभागात प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करत असताना तब्बल ४३.८० लाखांची अफरातफर केल्याचा आरोप आहे. फसवणूक, विश्वासभंग, सबळ पुरावे नष्ट करणे आणि शासकीय कर्मचाऱ्याद्वारे पदाचा दुरुपयोग या सारख्या गंभीर गुन्ह्यांत सहभाग आढळून आल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांखाली (१२० ब , ४०९, २०१, २०४) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सीबीआयच्या तपासात जुलै २०२३ ते जानेवारी २०२४ दरम्यान ७ आर्थिक व्यवहार आढळून आले. या व्यवहारांची एकूण रक्कम ४३.८० लाख रुपये इतकी असून त्यामध्ये अनुक्रमे २.९० लाख, ४.९० लाख, ३.९५ लाख, ४.९५ लाख, १३.९० लाख, ९.७५ लाख आणि ३.४५ लाखांचा अपहार झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात नितेश नाईक आणि एका स्थानिक दुकान मालकासह काही अज्ञात व्यक्तींनाही आरोपी करण्यात आले आहे. जेव्हा हे गैरव्यवहार उघडकीस आले, त्याच्या दुसऱ्या दिवशी तिघा लाभार्थ्यांनी त्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम एलआयसी शाखेत परत केली. उर्वरित प्रकरणाचा तपास सुरु आहे.
एफआयआरमध्ये नमूद केल्यानुसार, रतनबोली यांनी अफरातफर लपवण्यासाठी एलआयसीचे संबंधित रेकॉर्डस नष्ट करण्याचा किंवा बदल करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी ही रक्कम आधी तिऱ्हाईत व्यक्तींच्या खात्यांत हस्तांतरित केली आणि नंतर स्वतःच्या खात्यात वळवली होती. दरम्यान, या प्रकरणात एलआयसीला तब्बल ३० लाख रुपयांचे नुकसान सोसावे लागले. एलआयसीला ३० लाख रुपयांची रक्कम रतबोळी यांनी परत केल्यावरही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार आहे.