वैद्यकीय उपचारासाठी ५० टक्के सवलत जाहीर

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
4 hours ago
वैद्यकीय उपचारासाठी ५० टक्के सवलत जाहीर

पणजी : मुंबईत वैद्यकीय उपचारासाठी जाणाऱ्या गोमंतकीयांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. आता उपचाराच्या काळात मुंबईच्या गोवा भवनात राहण्यासाठी गोवा सरकारने ५० टक्के सवलत जाहीर केली आहे.
मुंबईच्या जुहू परिसरातील गोवा भवनाचे दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून, ते १० ऑगस्टपासून सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात येणार आहे. सामान्य प्रशासन खात्याने यासाठीचे दर निश्चित केले असून, मुंबईत वैद्यकीय उपचारासाठी जाणाऱ्या गोमंतकीयांना विशेष सवलत देण्यात येणार आहे.
जे गोमंतकीय मुंबईत उपचारासाठी गोवा भवनात राहण्याची इच्छा बाळगतात, त्यांनी संबंधित रुग्णालयाचे उपचार प्रमाणपत्र आणि स्वतःचे मतदार ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे. ही कागदपत्रे सादर केल्यानंतर त्यांना ५० टक्के सवलत लागू होईल.
एक दिवसासाठी खोलीचा दर १००० रु. आहे. सवलतीनंतर उपचारासाठी आलेल्या गोमंतकीयांना ५०० रु. दराने खोली उपलब्ध होईल.
सामान्य नागरिक, सरकारी अधिकारी, खासदार किंवा आमदार यांच्यासाठी दर सारखाच आहे. डॉरमिटरीसाठी प्रति व्यक्ती दर ४०० रु. निश्चित करण्यात आला आहे. स्वातंत्र्यसैनिकांसाठी विशेष दर लागू असून, खोलीसाठी दर दिवसाला ६०० रु., डॉरमिटरीसाठी दर ४०० रु. आहे.
शैक्षणिक सहलीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फक्त डॉरमिटरी सुविधा उपलब्ध आहे. अतिरिक्त चादर आणि गादीसाठी ३०० रु. अतिरिक्त शुल्क आकारले जाईल. सर्व खोल्या वातानुकूलित (एसी) आहेत.
कॅन्सर रुग्णांसाठी मोठा दिलासा
गोव्यातील अनेक नागरिक टाटा मेमोरियल रुग्णालयात कॅन्सरच्या उपचारासाठी मुंबईला जातात. केमोथेरपीसाठी अनेक आठवडे त्यांना मुंबईतच राहावे लागते. उपचारांचा खर्च परवडणारा असला तरी राहण्याचा खर्च मोठा अडथळा ठरतो. या पार्श्वभूमीवर ही ५० टक्के सवलत गरीब व गरजू कुटुंबांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.