‘फ्रॉलीक’ कार्यक्रमातील अश्लील चाळ्यांची मानवाधिकार आयोगाकडून दखल
पणजी : गोवा विद्यापीठात फ्रॉलिक या सांस्कृतिक कार्यक्रमात ‘अंडरवेअर’ मध्ये विद्यार्थ्यांची परेड आयोजित करण्याच्या प्रकरणाची गोवा मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेतली आहे.
चाक महिन्यांपूर्वी ‘फ्रॉलीक’ कार्यक्रम आयोजित केला होता. त्यातील तपशील आता समोर आल्यामुळे आयोगाने विद्यापीठाला चौकशी अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. या कार्यक्रमातील अश्लील फॅशन शोचै प्रकरण आता आयोजकांना शेकण्याची शक्यता आहे.
घडलेल्या आक्षेपार्ह प्रकाराची विद्यापीठाच्या अंतर्गत शिस्तपालन समितीकडून चौकशी सुरू आहे. ही समिती अहवाल सोमवारपर्यंत विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळासमोर ठेवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
या कार्यक्रमाला चार महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटलेला आहे. हा प्रकार विद्यापीठाच्या निदर्शनास आल्यानंतर अंतर्गत शिस्तपालन समितीने तपासास सुरवात केल्याची माहिती कुलसचिवांच्या कार्यालयाकडून मिळाली. आता मानवाधिकार आयोगाने फ्रॉलीकमध्ये घडलेल्या आक्षेपार्ह प्रकाराबद्धल कुलगुरूंना नोटीस पाठवली आहे. यामुळे पुन्हा हे प्रकरण उजेडात आले आहे. अंतर्गत समिती जो अहवाल देईल, त्यावर आधारीत कुलगुरू मानवाधिकार आयोगाच्या नोटिसीला उत्तर देतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.