गोव्यापाठोपाठ 'या' राज्यात हृदयरोगाचा कहर; अवघ्या ४० दिवसांत २३ जणांचा हार्टअटॅकने मृत्यू

हजारो नागरिकांची तपासणीसाठी दवाखान्यात रांग

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
11 hours ago
गोव्यापाठोपाठ 'या' राज्यात हृदयरोगाचा कहर; अवघ्या ४० दिवसांत २३ जणांचा हार्टअटॅकने मृत्यू

हासनः बदलती जीवनशैली, सकस आहाराचा अभाव, व्यसनाधीनता अशा विविध कारणांमुळे गोव्यात हृदयविकाराने दिवसाला सरासरी १२ जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी दोन दिवसांपूर्वीच प्रसिद्ध करण्यात आली होती. त्याचअनुषंगाने गोव्यालगतच्या कर्नाटक राज्यातूनही अशीच धक्कादायक माहिती समोर येतेय.

कर्नाटकातील हासनमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. गेल्या ४० दिवसांत हृदयविकाराच्या झटक्याने २३ जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे त्यापैकी सहा जण १९ ते २५ वयोगटातील होते, तर आठजण २५ ते ४५ वर्षांच्या दरम्यान होते. दुसरीकडे, बंगळुरूमधील जयदेवा रुग्णालयात हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या ८ टक्क्याने वाढल्याची माहिती मिळाली आहे. 

याप्रकारांमुळे दररोज हजारो लोक हृदयाशी संबंधित तपासणीसाठी म्हैसूरच्या जयदेवा रुग्णालयात येत आहेत. हासन येथील हृदयविकाराच्या प्रकरणांच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या घटनेचा संबंध कोविड लसीकरणासोबत जोडला असून सरकारने चौकशीसाठी पाच सदस्यीय समिती स्थापन केली असल्याची माहिती मिळाली आहे.


(ह्रदय तपासणीसाठी म्हैसूरच्या जयदेवा रुग्णालयात जमा झालेले नागरिक)

या समितीचे मुख्य आणि बंगळुरूमधील श्री जयदेव कार्डिओव्हस्कुलर सायन्सेस अँड रिसर्च (SJICSR) चे संचालक डॉ. के. एस. रवींद्रनाथ यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना हासन घटनेबाबत एक प्रोफॉर्मा पाठवल्याचे सांगितले आहे. 

त्यांनी पाठवलेल्या प्रोफॉर्मामध्ये मृतांचा डेटा गोळा करत असताना लठ्ठपणा, कोलेस्टेरॉल, मधुमेह, तंबाखू, अल्कोहोल, अनुवंशशास्त्र, कौटुंबिक इतिहास आणि कोणत्याही संसर्गासाठी औषधांचा वापर, जीवनशैली आणि क्रॅश डाएटमध्ये सहभागी होणे यासारख्या संबंधित गोष्टी देखील विचारल्या गेल्या आहेत. दरम्यान हासनमधील घटना का घडल्या याची खरी कारणे शोधण्यासाठी पुढील तपासाची आवश्यकता आहे, असे बंगळुरूमधील एसजेआयसीएसआर येथील कार्डिओलॉजीचे प्राध्यापक के एस सुब्रमणी म्हणाले.

'सीपीआर'चे प्रशिक्षण देणार
सोमवारी तज्ञ समितीच्या शिफारशींवर चर्चा करण्यासाठी झालेल्या बैठकीनंतर आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी अशी माहिती दिली की, सरकार १५ वर्षे आणि त्यावरील शालेय मुलांमध्ये हृदय दोषांची तपासणी सुरू करणार आहे. श्वासोच्छवास किंवा हृदयाचे ठोके थांबल्यावर दिले जाणारे कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन (सीपीआर) चे प्रशिक्षण, एनजीओंना दिले जाईल. आम्ही सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी देखील वार्षिक मुलभूत आरोग्य तपासणी देखील सुरू करणार आहोत.

कोणतीही लक्षणे नसलेल्यांना मृत्यूने घेरले
गेल्या महिन्यात, हसन जिल्ह्यात किमान २० लोक हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावले होते. त्यापैकी अनेकांना पूर्वी कोणतीही लक्षणे किंवा आजार नव्हते. हसन जिल्ह्याच्या उपायुक्त के.एस. लताकुमारी म्हणाल्या की, "असंसर्गजन्य आजारांच्या तज्ज्ञांची एक टीम या प्रकरणाची चौकशी करेल आणि लवकरच अहवाल सादर करेल. या अहवालात हृदयविकाराच्या कारणांचा अभ्यास केला जाईल."

माध्यमांच्या वृत्तांमुळे खळबळ उडाली
स्थानिक प्रसार माध्यमांनी किशोरवयीन आणि तरुणांचे मृत्यूंच्या बातम्या प्रसारित केल्यानंतर हासनमधील रहिवाश्यांमध्ये खळबळ उडाली आणि काही जिल्ह्यांतील रुग्णालयांमध्ये तपासणीसाठी मोठ्या संख्येने लोक जमल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

दरवर्षी सुमारे १.७५ कोटी लोक हृदय रोगामुळे दगावतात
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, दरवर्षी सुमारे ६ कोटी लोकांचा मृत्यू होतो. यापैकी सुमारे ३२ टक्के मृत्यू हृदयरोगामुळे होतात. जगात या आजारामुळे सर्वाधिक मृत्यू होतात. दरवर्षी सुमारे १.७५ कोटी लोक कोणत्या ना कोणत्या हृदयरोगामुळे आपले प्राण गमावत आहेत. पूर्वी, हृदयरोगाचे बहुतेक रुग्ण ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते. आता नवीन समस्या अशी आहे की गेल्या काही वर्षांत, ३० वर्षांपेक्षा कमी वयाचे लोक देखील त्याचे बळी ठरत आहेत. कोविडनंतर, हृदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.       

हेही वाचा