ग्रामीणच्या तुलनेत शहरी भागात आई होण्याचे वयोमान अधिक

शिक्षण, करियरला प्राधान्य : लवकर माता होण्यामध्ये ग्रामीण भागात आघाडीवर

Story: पिनाक कल्लोळी |
7 hours ago
ग्रामीणच्या तुलनेत शहरी भागात आई होण्याचे वयोमान अधिक

गोवन वार्ता
पणजी : गेल्या काही वर्षांत महिलांमध्ये मुलांना उशिरा जन्म देण्याचे प्रमाण वाढले आहे. शिक्षण, नोकरी, करियर किंवा अन्य कारणांमुळे महिला मूल जन्माला घालण्याचा निर्णय वेळाने घेतात. राज्याच्या ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात मूल जन्माला घालण्याचे, म्हणजेच आई होण्याचे वय अधिक आहे. नियोजन, सांख्यिकी आणि मूल्यमापन खात्याने जारी केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
अहवालानुसार, २०२४ मध्ये ग्रामीण भागात ६,२१६ मातांनी मुलांना जन्म दिला. यातील सर्वाधिक २,१५५ माता (३४.६६ टक्के) या २५ ते २९ वर्षे वयोगटातील होत्या. याच कालावधीत शहरी भागात १० हजार २८२ मातांनी मुलांना जन्म दिला. यातील सर्वाधिक ३,५९४ माता (३४.९४ टक्के) या ३० ते ३४ वर्षे वयोगटातील होत्या. याशिवाय ग्रामीण भागात २० ते २४ वर्षे वयोगटातील महिला माता होण्याचे प्रमाण २१.४६ टक्के होते. शहरी भागात हेच प्रमाण १४.१८ टक्के होते.
शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात लवकर माता होण्याचे प्रमाण मागील वर्षीदेखील कायम होते. २०२३ मध्ये ग्रामीण भागात ५,९८६ मातांनी मुलांना जन्म दिला. यातील सर्वाधिक २,०३३ माता (३३.९३ टक्के) या २५ ते २९ वर्षे वयोगटातील होत्या. याच कालावधीत शहरी भागात ११ हजार १११ मातांनी मुलांना जन्म दिला. यातील सर्वाधिक ३,८३० माता (३४.४७ टक्के) या ३० ते ३४ वर्षे वयोगटातील होत्या. ग्रामीण भागात २० ते २४ वर्षे वयोगटातील महिला माता होण्याचे प्रमाण २०.९६ टक्के, तर शहरी भागात १५.३१ टक्के होते.
सांख्यिकी खात्याच्या २०१४ ते २०२४ च्या अहवालांनुसार, शहरी भागात ३५ ते ३९ वर्षे वयोगटातील महिलांची आई होण्याची टक्केवारी वाढत आहे. २०१४ मध्ये एकूण १४ हजार २५३ महिलांनी मुलांना जन्म दिला. यात ३५ ते ३९ वर्षे वयोगटातील महिला १,४४६ म्हणजेच १०.१४ टक्के होत्या. २०२४ मध्ये एकूण १६ हजार ४९८ महिलांनी मुलांना जन्म दिला. यात ३५ ते ३९ वर्षे वयोगतातील महिला २,२१९ म्हणजेच १३.४५ टक्के होत्या.
१५ ते १९ वर्षे वयोगटातील मातांचे प्रमाण अत्यल्प
अहवालानुसार, राज्यात १५ ते १९ वर्षे आणि ४५ हून अधिक वर्षे वयोगटातील महिला आई होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. २०२४ मध्ये १५ ते १९ वर्षे वयोगटातील २०१ महिलांनी बालकांना जन्म दिला. हे प्रमाण १.२१ टक्के होते. ४५ वर्षांहून अधिक वयोगटाच्या ९८ महिलांनी बालकांना जन्म दिला. हे प्रमाण ०.६२ टक्के होते.            

हेही वाचा