१५ साक्षीदारांची साक्ष नोंद : पुढील सुनावणी ११ जुलै रोजी
पणजी : शेअर मार्केटमध्ये जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हा विभागाने (ईओसी) व्हॅलेरियन ऑगस्टीन मेंडान्हा याच्याविरोधात मेरशी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात ९६९ पानी आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात १५ साक्षीदारांची साक्ष नोंद करण्यात आली असून पुढील सुनावणी ११ जुलै रोजी होणार आहे.
उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने २७ जुलै २०२१ रोजी गुन्हा दाखल करण्याचा निवाडा दिला होता. त्यानुसार, तक्रारदार निकोलस डिमेलो याला एमएसएस ट्रेडिंग सिस्टम सेंटरचे मालक तथा संशयित व्हॅलेरियन ऑगस्टीन मेंडान्हा याने शेअर मार्केटमध्ये ज्यादा परतावा देण्याच्या बहाण्याने गुंतवणूक करण्यास भाग पाडले होते. तक्रारदार डिमेलो यांना संशयिताने २० जुलै २०१८ ते २०२१ दरम्यान आर. के. ग्लोबल शेअर्स अँड सिक्युरिटीज लि. मध्ये ७ लाख ७२ हजार ५०० रुपये गुंतवणूक करण्यास लावले. तसेच संशयिताने ऑक्टोबर २०१८ ते २० ऑक्टोबर २०१९ पर्यंत वरील रकमेवर प्रतिदिन १० हजार रुपये परतावा आणि २४ लाख रुपये देण्याचे आमिष दाखविले. त्यानुसार ठरल्याप्रमाणे संशयिताने त्याला परतावा दिला नसल्यामुळे तक्रारदाराने न्यायालयात धाव घेतली होती. ईओसीचे उपनिरीक्षक परेश रामनाथकर यांनी न्यायालयाच्या निवाड्यानुसार, २९ जुलै २०२१ रोजी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. याच दरम्यान संशयिताने तक्रारदाराला ३ लाख ३० हजार रुपये परत केले. याची दखल घेऊन ईओसीने तपास पूर्ण केल्यानंतर संशयित व्हॅलेरियन ऑगस्टीन मेंडान्हा याने तक्रारदार निकोलस डिमेलो यांची ४ लाख ४२ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी वरील न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.