गळा आवळून झाला होता खून
पणजी : आंबेडे-नगरगाव येथील श्रवण देविदास बर्वे याच्या खून प्रकरणातील संशयित तथा त्याचा भाऊ उदय बर्वे याला मेरशी येथील उत्तर गोवा अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने २५ हजार रुपये व इतर अटींवर जामीन मंजूर केला आहे. याबाबतचा आदेश अतिरिक्त सत्र न्या. क्षमा जोशी यांनी दिला.
श्रवण देविदास बर्वे याचा खून झाल्याचे दि. १५ एप्रिल २०२५ रोजी उघडकीस आले होते. याप्रकरणी श्रवण याचे वडील देविदास बर्वे यांच्या तक्रारीच्या आधारे वाळपई पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद केला होता. पोलीस चौकशीत दोरीच्या साहाय्याने श्रवण याचा गळा आवळून हत्या झाल्याचे उघडकीस आले होते. पोलिसांनी संशयित वासुदेव ओझरेकर याला प्रथम अटक केली होती. त्याचा जबाब घेतल्यानंतर श्रवणचे वडील देविदास बर्वे व भाऊ उदय बर्वे या दोघांचा सहभाग असल्याचे समोर आल्यानंतर त्या दोघांना पोलिसांनी अटक केली.
दरम्यान, दुसरा संशयित तथा श्रवणचा भाऊ उदय बर्वे याने न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. या प्रकरणी न्यायालयाने उदय बर्वे याला २५ हजार रुपये, दहा दिवस वाळपई पोलीस स्थानकावर सकाळी १० ते १ दरम्यान हजेरी लावणे व इतर अटींवर सशर्त जामीन मंजूर केला.
ओझरेकरचा फेटाळला होता जामीन
या प्रकरणातील संशयित वासुदेव ओझरेकर याने न्यायालयात दाखल केलेला जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला होता. या गुन्ह्याला जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा असून तपास प्राथमिक टप्प्यावर आहे. तसेच चौकशीसाठी अद्याप संशयिताला कोठडी आवश्यक आहे, असे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने ओझरेकरचा जामीन फेटाळला होता.