उत्तर गोवा जिल्हाधिकारी अंकित यादव यांचे आदेश
पणजी : धिरयोंसारख्या प्रकारांवर कारवाई करण्यासाठी उत्तर गोव्यातील मांद्रे आणि आगशी येथे समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी या समित्यांच्या स्थापनेबाबत आदेश जारी केला आहे.
अवमान याचिकेवरील न्यायालयाच्या आदेशानुसार या समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. आगशी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीत तिसवाडीचे संयुक्त मामलेदार, आगशीचे पोलीस निरीक्षक, पशुवैद्यकीय खात्याच्या अधिकारी डॉ. प्रिया दलाल आणि प्राणीप्रेमी संघटनेचे प्रतिनिधी हनुमान गावस यांचा समावेश आहे.
मांद्रे पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात स्थापन झालेल्या समितीत पेडणेचे संयुक्त मामलेदार, पेडणेचे पोलीस निरीक्षक, पशुवैद्यकीय खात्याचे डॉ. इलेट द गामा आणि जनावरांच्या कल्याण संघटनेतील स्वाती शिलकार यांचा समावेश आहे.
सध्या कायद्याने धिरयो आणि बैलांच्या झुंजीवर बंदी आहे. या बंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दोन दिवसांपूर्वी बैठक घेण्यात आली होती.
या बैठकीला पोलीस अधिकारी तसेच प्राणीमित्र संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. काही लोकांना धिरयोंचा आनंद मिळतो, मात्र बैलांना यातून त्रास सहन करावा लागतो. बऱ्याच वेळा बैल जखमी होतात, तर कधी मृत्यूही ओढवतो. हरमल, हडफडे, मांद्रे, मोरजी आदी भागांमध्ये धिरयो होतात. त्यामुळे संबंधित पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी गस्त वाढवून अशा घटनांवर लक्ष ठेवावे. कुठे धिरयो होत असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी पोलिसांना तत्काळ कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पंचायत आणि नगरपालिका मंडळांच्या सहकार्याने जनजागृती करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी दिले.
धिरयो रोखण्यासाठी समित्यांची स्थापना
याआधी दक्षिण गोव्यात धिरयोंवर लक्ष ठेवण्यासाठी अशाच समित्यांची स्थापना झाली होती. आता उत्तर गोव्यातही मांद्रे आणि आगशी परिसरात धिरयो होण्याच्या घटना घडत असल्याने त्या रोखण्यासाठी या समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.