दोन लाखांचे लाकूड जप्त
धारबांदोडा : मरड-धारबांदोडा येथे सुमारे दोन लाख रुपये किमतीचे खैरीचे लाकूड वन खात्याने जप्त केले असून तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. गेल्या दोन वर्षांपासून धारबांदोड्यात मोठ्या प्रमाणात खैरीच्या झाडांची तस्करी होत असल्याचे वारंवार उघड झाले आहे.
मरड येथे जप्त केलेल्या खैरीच्या लाकडाची किंमत अंदाजे दोन लाख रुपये आहे, तर सरकारी किंमत साठ ते सत्तर हजार इतकी आहे. कुळे विभागीय वनअधिकारी रवी नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्युटीवर असलेल्या फॉरेस्ट गाईडना सायंकाळी ५:३० वाजता मरड येथे खैरीचे लाकूड गाडीत भरले जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर छापा टाकून मुद्देमालासह सूर्यकांत उगाडेकर, नारायण खरवत (दोघेही रा. दोडामार्ग ) व विनायक कुट्टीकर (रा. पणसुले-धारबांदोडा) या तिघांना ताब्यात घेण्यात आले. शिवाय जीए ०४ टी ५८७१ हा टेम्पो ताब्यात घेण्यात आला आहे.
कारवाईत कुळे विभागीय वनअधिकारी रवी शिरोडकर, राऊंड फॉरेस्टर गोपाळ जल्मी ,फॉरेस्ट गार्ड रामनाथ पेडणेकर, सुनील नाईक, आशिष नाईक व बाबी मांद्रेकर यांचा समावेश होता. सध्या वनअधिकारी रवी शिरोडकर पुढील तपास करत आहेत.