कोलवाळ पोलिसांकडून बिहारच्या तरुणाला अटक
पणजी : नॅचरल्स आईस्क्रीमची फ्रँचायझी देण्याच्या बहाण्याने थिवी -बार्देश येथील एका व्यक्तीला ४.२४ लाखांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी कोलवाळ पोलिसांनी आलोक कुमार (१९, पाटणा - बिहार) याला अटक केली.
कोलवाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थिवी - बार्देश येथील एका व्यक्तीने १० जून रोजी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, मे २०२५ ते ९ जून २०२५ दरम्यान अभिषेक शर्मा या व्यक्तीने नॅचरल्स आईस्क्रीम कंपनीचा विक्री सल्लागार असल्याचे भासवून तक्रारदाराला वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून संपर्क केला. त्याने तक्रारदाराला नॅचरल्स आईस्क्रीम कंपनीची फ्रँचायझी देण्याच्या बहाण्याने त्याला विविध बँक खात्यात ४ लाख २४ हजार ९०० रुपये जमा करायला लावले. त्यानंतर कंपनीचे बनावट नोंदणी प्रमाणपत्र पाठवून आणखीन रक्कम जमा करण्यास सांगितले. याचवेळी तक्रारदाराला संशय आल्यानंतर त्याने चौकशी केली असता, त्याची फसवणूक झाल्याचे समोर आले. त्याने कोलवाळ पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. याची दखल घेऊन पोलीस निरीक्षक संजीत कांदोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्वानंद प्रभू यांनी गुन्हा दाखल केला. मोबाईल क्रमांक, पैसे जमा केलेल्या बँक खात्याची तपासणी केली असता, सदर बँक खाते पाटणा-बिहार येथील एका व्यक्तीचे असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता आणि उपअधीक्षक विल्सन डिसोझा यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सजीत कांदोळकर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक स्वानंद प्रभू, कॉ. विनोद शर्मा, समीर नाईक यांना पाटणा येथे पाठविण्यात आले. तर, पथकाला गोव्यातून हवालदार गुरुदास मांद्रेकर, शशांक नाईक, उद्देश परब यांनी मदत केली. पथकाने संशयित आलोक कुमार (१९) याला पालीगंज बिहार येथून ६ जुलै रोजी अटक केली. त्याच्या बँक खात्यात २ लाख होते. वरील रक्कम गोठविण्यात आली आहे.
संशयिताला तेथील न्यायालयात हजर करून हस्तांतरण रिमांडवर ९ जून रोजी गोव्यात आणले. म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला पाच दिवस पोलीस कोठडी ठोठावली.
संशयितावर इतर राज्यांत पाच गुन्हे दाखल
नॅचरल्स आईस्क्रीमची फ्रँचायझी देण्याच्या बहाण्याने अटक केलेल्या संशयित आलोक कुमार याच्या विरोधात इतर राज्यांत पाच गुन्हे दाखल आहेत. त्याच्या बँक खात्यात सुमारे २२. २ लाख रुपये फसवणुकीचे रक्कम जमा झाल्याचे समोर आले आहे.