बिबट्याच्या धडकेत स्कूटरस्वार विद्यार्थी जखमी

Story: वार्ताहर। गोवन वार्ता |
10th July, 11:46 pm
बिबट्याच्या धडकेत स्कूटरस्वार विद्यार्थी जखमी

हरमल : येथील आगरवाडा चोपडे चढणीवर बिबट्याने रस्ता ओलांडून पळ काढण्याचा प्रयत्न केला असता, हरमलला जाणाऱ्या स्कूटरला जोरदार धडक बसली. सुदैवाने यात विद्यार्थी किरकोळ जखमी झाला. मात्र, या घटनेमुळे वाहनचालकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास हरमल येथील हॉटेल मॅनेजमेंटचा विद्यार्थी असफ निकोलस (२४) स्कूटरने चोपडेहून हरमल येथे येत होता. चढणीवरील हॉटेलच्या जरा पुढे पोचल्यानंतर, बिबट्या रस्ता ओलांडत असताना स्कूटरला धडक बसली. विद्यार्थी स्कूटरसह उजव्या बाजूला तर बिबट्या डाव्या बाजूला पडला. बिबट्याला पाहून विद्यार्थ्याने आरडाओरड करीत हॉटेलमध्ये धाव घेतली. यानंतर बिबट्याने तेथून धूम ठोकली. हॉटेल कर्मचाऱ्यांनी आपली मदत केली, असे निकोलस यांनी सांगितले.

असफ निकोलसने हेल्मेट घातल्याने त्याला किरकोळ दुखापत झाली. त्याच्या हाताच्या कोपराला व पायाला किंचित जखमा झाल्या. स्कूटरचे किरकोळ नुकसान झाले.

दरम्यान, मागील आठवड्यात दांडोसवाडा मांद्रे भागात रात्री ११ वाजता बिबट्याने अंगणात प्रवेश केल्याचे दिसून आले. मध्यंतरी हरमल नानोस्करवाडा येथे बिबट्याला जेरबंद केल्यानंतर पुन्हा दर्शन झाले नाही. मात्र, मांद्रेत बिबट्या दिसल्याने कदाचित तोच बिबट्या सर्वत्र संचार करीत असावा, अशी शक्यता नागरिकांनी व्यक्त केली. 

हेही वाचा