विक्रमी खेळाडूंच्या पंक्तीत सामील : ग्रास कोर्टवर १०० विजय मिळवणारा जगातील तिसरा खेळाडू
लंडन : टेनिस जगतात सर्वाधिक २४ ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या नोव्हाक जोकोविचने ग्रास कोर्टवर आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. विम्बल्डनमध्ये तिसऱ्या फेरीत सर्बियाचा खेळाडू मिओमिर केकमानोविचवर ६-३, ६-०, ६-४ अशा फरकाने विजय मिळवताच, हा त्याच्या कारकिर्दीतील ग्रास कोर्टवरील १०० वा विजय ठरला. या विजयासह तो विम्बल्डनमध्ये विजयाचे शतक झळकवणारा जगातील तिसरा खेळाडू बनला आहे.
जोकोविचने नोंदवले विजयाचे शतक
नोव्हाक जोकोविचने विम्बल्डन २०२५ च्या पहिल्या फेरीत मुलरला चार सेटमध्ये हरवले. यानंतर दुसऱ्या फेरीत एव्हान्सला सलग तीन सेटमध्ये पराभूत करून विम्बल्डनमधील आपला ९९ वा विजय मिळवला होता. तिसऱ्या फेरीत स्वदेशातील खेळाडू मिओमिर केकमानोविचविरुद्ध विजय मिळवून त्याने विजयाचे शतक पूर्ण केले. यामुळे तो आता विम्बल्डनमध्ये १०० विजय नोंदवणाऱ्या रोजर फेडरर आणि मार्टिना नवरातिलोवा यांच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. विम्बल्डनच्या या ऐतिहासिक कोर्टवर १०० विजय मिळवल्यानंतर जोकोविच म्हणाला, माझ्या आवडत्या स्पर्धेत मी जे काही इतिहास घडवीन, त्याबद्दल मी आभारी आहे.
फेडररच्या विक्रमापासून एक पाऊल दूर
३८ वर्षीय नोव्हाक जोकोविच आपल्या कारकिर्दीतील २० वे विम्बल्डन खेळत आहे. जोकोविचने आतापर्यंत एकूण सात वेळा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे, तर सर्वाधिक आठ वेळा विम्बल्डनचे विजेतेपद रोजर फेडररने जिंकले आहे. अशा परिस्थितीत, जोकोविचने यावर्षी विम्बल्डनचे विजेतेपद जिंकल्यास, तो फेडररच्या ऐतिहासिक विक्रमाशी बरोबरी करेल. जोकोविचचा पुढील सामना ११ व्या मानांकित अॅलेक्स डी मिनाउर सोबत होणार आहे.
युकी भांबरी पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश!
भारताचा स्टार टेनिसपटू युकी भांबरीने विम्बल्डन टेनिस ग्रँडस्लॅममध्ये आपली विजयी घोडदौड सुरू ठेवली आहे. शनिवारी त्याने अमेरिकेचा जोडीदार रॉबर्ट गॅलोवे याच्यासह पुरुष दुहेरीच्या तिसऱ्या फेरीत (प्री-क्वार्टर फायनल) प्रवेश केला. विम्बल्डनमध्ये आता युकी भांबरी हा एकमेव भारतीय खेळाडू स्पर्धेत शिल्लक राहिला आहे.
१६ वी सीड असलेल्या युकी-गॅलोवे जोडीने पोर्तुगालच्या नूनो बोर्गेस आणि मार्कोस गिरोन यांच्या जोडीचा दीड तासांच्या लढतीत ६-३, ७-६ (८-६) असा पराभव केला. आता उपांत्यपूर्व फेरीत त्यांचा सामना स्पेनच्या मार्सेलो ग्रॅनोलर्स आणि अर्जेंटिनाच्या होरासियो जेबेलोस यांच्या अनुभवी जोडीशी होईल.
इतर भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात
इतर भारतीय खेळाडूंसाठी मात्र विम्बल्डन निराशाजनक ठरले. एन श्रीराम बालाजी आणि रित्विक बोलिपल्ली आपापल्या जोडीदारांसह दुसऱ्या फेरीत पराभूत होऊन स्पर्धेतून बाहेर पडले. बालाजी आणि त्यांचा मेक्सिकन जोडीदार मिगुएल रेयेस-वारेला यांनी चौथ्या मानांकित मार्सेल ग्रॅनोलर्स आणि होरासियो जेबालोस या स्पेन-अर्जेंटिनाच्या जोडीने बालाजी आणि रेयेस-वारेला यांना एक तास २० मिनिटे चाललेल्या सामन्यात ६-४, ६-४ असे हरवले.
बोल्लिपल्ली आणि कोलंबियाचा त्याचा जोडीदार निकोलस बॅरिएंटोस यांनीही सहाव्या मानांकित सॅलिसबरी आणि नील स्कूपस्की यांच्या जोडीला झुंजवले. मात्र, भारत आणि कोलंबियाच्या या जोडीला एक तास ४७ मिनिटे चाललेल्या सामन्यात ४-६, ६-७ असा पराभव पत्करावा लागला.