इंग्लंड-भारत तिसरी कसोटी : आर्चर, बुमराहचे पुनरागमन
लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना १० जुलैपासून लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळवला जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने जिंकला होता, तर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने दमदार पुनरागमन करत विजय मिळवला. त्यामुळे सध्या मालिका १-१ अशी बरोबरीत असून, अजून तीन सामने बाकी आहेत.
लीड्स कसोटी गमावल्यानंतर भारताने एजबॅस्टनमध्ये ३३६ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला. या सामन्यात जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली होती. मात्र, विजयानंतर शुभमन गिलने तिसऱ्या कसोटीत बुमराह परतणार असल्याचे संकेत दिले आहेत.
इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनचा विचार करून टीम इंडिया आपली रणनीती तयार करेल. त्यामुळे, भारतीय संघात काही मोठे बदल अपेक्षित आहेत. पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये अपेक्षित कामगिरी न करणाऱ्या करुण नायरला बाहेर बसावे लागू शकते.
पहिल्या कसोटीत जखमी झालेल्या साई सुदर्शनची संघात वापसी निश्चित मानली जात आहे. कुलदीप यादवच्या निवडीवरून सुरू असलेला वादही आता शमू शकतो; त्याला तिसऱ्या कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. मात्र, जर टीमला फलंदाजी मजबूत करायची असेल तर तर वॉशिंग्टन सुंदर संघात कायम राहू शकतो. खराब गोलंदाजीमुळे टीकेचा सामना करत असलेल्या प्रसिद्ध कृष्णाला मात्र बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.
दरम्यान, या मालिकेच्या प्रवासाला निर्णायक वळण देणारा तिसरा सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी कंबर कसली आहे. दुसरीकडे, इंग्लंडने तिसऱ्या कसोटी सामन्याच्या एक दिवस आधीच आपली अंतिम प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. यामध्ये वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरची संघात वापसी झाली आहे, ज्यामुळे इंग्लंडच्या गोलंदाजीला बळकटी मिळेल.
जोफ्रा आर्चरने २०१९ ते २०२१ दरम्यान इंग्लंडसाठी १३ कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात त्याने ३१.०४ च्या सरासरीने ४२ विकेट्स घेतल्या आहेत. २०१९ च्या अॅशेस मालिकेत त्याने २०.२७ च्या सरासरीने २० विकेट्स मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली होती. दरम्यान, कौटुंबिक कारणामुळे जोफ्रा आर्चर दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकला नव्हता, पण आता तो तिसऱ्या सामन्यासाठी सज्ज आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) यासंदर्भात निवेदन जारी केले आहे.
भारताविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंडच्या गोलंदाजीला अपेक्षित यश मिळाले नव्हते, त्यावेळी आर्चर आणि मार्क वूड यांची उणीव प्रकर्षाने जाणवली होती. आता आर्चरच्या संघात परतण्याने इंग्लंडच्या गोलंदाजीला बळकटी मिळाली आहे. त्यामुळे भारतीय फलंदाजांचे आव्हान वाढले आहे. पहिल्या दोन सामन्यांतील कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी भारतीय फलंदाजांना जोफ्रा आर्चरच्या भेदक माऱ्याला सामोरे जावे लागणार आहे. या आव्हानात यशस्वी झाल्यास भारताचा विजय निश्चित मानला जात आहे.
बुमराहच्या परतण्याने गोलंदाजीला धार
वेगवान गोलंदाजीच्या आक्रमणात जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि आकाश दीप हे आपली भूमिका बजावताना दिसू शकतात. चौथ्या वेगवान गोलंदाजाच्या रूपात नितीश कुमार रेड्डीला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली जाऊ शकते. एकंदरीत, भारतीय संघात तीन बदल होण्याची शक्यता आहे. फलंदाजी विभागात संघाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे.
जोफ्रा आर्चरचे चार वर्षांनंतर कसोटीत पुनरागमन
इंग्लंडने तिसऱ्या कसोटीसाठी आपला प्लेइंग इलेव्हन जाहीर केला असून, त्यात वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरची एन्ट्री झाली आहे. तब्बल चार वर्षांनंतर तो कसोटी संघात पुनरागमन करत आहे. जोश टंगच्या जागी त्याला संघात स्थान देण्यात आले आहे. आर्चर गेल्या काही वर्षांपासून कोपरा आणि पाठदुखीच्या दुखापतींशी झुंज देत होता, परंतु आता तो पूर्णपणे बरा झाला असून मैदानात परतण्यासाठी उत्सुक आहे. त्याने अखेरचा कसोटी सामना फेब्रुवारी २०२१ मध्ये खेळला होता, जो अहमदाबादमध्ये भारताविरुद्धच होता.
लॉर्ड्स कसोटीसाठी इंग्लंडची खास तयारी
बर्मिंगहॅम कसोटीत टीम इंडियाकडून ३३६ धावांनी दारुण पराभव पत्करावा लागल्याने इंग्लंडच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. यामुळे आगामी लॉर्ड्स कसोटी जिंकण्यासाठी यजमान संघाने कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर, इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांनी लॉर्ड्सच्या क्युरेटरकडे आपल्या वेगवान गोलंदाजांना पूरक ठरेल अशी खेळपट्टी तयार करण्याची विनंती केली आहे.
........
इंग्लंडची प्लेइंग ११ : जॅक क्राउली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, शोएब बशीर.
संभाव्य भारतीय संघ : यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल, ऋषभ पंत, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव/वॉशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह, आकाश दीप और मोहम्मद सिराज