भारत ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर

कर्णधार शुभमन गिलचे विक्रमी शतक : इंग्लंड ३ बाद ७२

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
10 hours ago
भारत ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर

बर्मिंगहॅम : दुसऱ्या कसोटीत भारत ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर आहे. भारताने चौथ्या दिवशी ६ बाद ४२७ धावांवर डाव घोषित करून पहिल्या डावातील १८३ धावांच्या आघाडीच्या जोरावर ६०७ धावांचे विशाल लक्ष्य इंग्लंडसमोर ठेवले आहे. प्रत्युत्तरात दिवसअखेर इंग्लंडची ३ बाद ७२ अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे भारताला ​जिंकण्यासाठी केवळ ७ गड्यांची आवश्यकता आहे. दरम्यान, भारतीय कर्णधार शुभमन गिलने पहिल्या डावातील २६९ धावांनंतर दुसऱ्या डावात शतक झळकावून अनेक विक्रम कवेत घेतले.
भारताच्या ५८७ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव ४०७ धावांवर गडगडला. १८३ धावांची आघाडी घेत भारताने दुसऱ्या डावातही वर्चस्व गाजवले. लोकेश राहुलच्या ५५ धावांच्या खेळीनंतर रिषभ पंत व शुभमन यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना घाम फोडला. चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात या दोघांनी फटकेबाजी केली. रिषभ ५८ चेंडूंत ८ चौकार व ३ षटकारांसह ६५ धावांवर झेलबाद झाला. त्याने कर्णधारासह १०३ चेंडूंत ११० धावांची भागीदारी केली.
शुभमनला त्यानंतर रवींद्र जडेजाची साथ मिळाली. भारताच्या धावांची गती किंचीत मंदावली, परंतु शुभमनच्या शतकाने पुन्हा एकदा कसोटी गाजवली. १९७१ मध्ये सुनील गावस्कर यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध एकाच कसोटीत द्विशतक व शतक असा पराक्रम केला होता आणि त्यानंतर ५४ वर्षांनी शुभमनच्या रुपाने भारतीयाकडून असा विक्रम पाहायला मिळाला. जगात एकाच कसोटीत २५० हून अधिक आणि १०० हून ​अधिक धावा करणारा शुभमन हा ग्रॅहम गूच व कुमार संगकारा यांच्यानंतरचा तिसरा फलंदाज ठरला.
कर्णधार म्हणून एकाच कसोटीत दोन शतके झळकावणारा तो पहिला भारतीय आणि जगातील तिसरा कर्णधार ठरला. यापूर्वी अॅलेन मेलव्हिल (१९४७) व इंजमाम-उल-हक (२००५) यांनी हा पराक्रम केला होता. या खेळीसह शुभमनने इंग्लंडविरुद्धच्या या कसोटीत ५०० हून अधिक धावांचा टप्पाही ओलांडला. सुनील गावस्कर (१९७९), राहुल द्रविड (२००२) व विराट कोहली (२०१८) यांच्यानंतर इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत हा टप्पा ओलांडणारा तो चौथा भारतीय ठरला.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत मार्नस लाबुशेन याच्यानंतर एकाच कसोटीत द्विशतक व शतक करणारा शुभमन हा दुसरा फलंदाज आहे. एकंदर असा पराक्रम कसोटी क्रिकेटमध्ये ९ फलंदाजांनी केला आहे. चहापानापर्यंत भारताकडे ४८४ धावांची आघाडी होती आणि बर्मिंगहॅम येथील ही प्रथम श्रेणी क्रिकेटमधील चौथ्या डावातील सर्वोत्तम धावसंख्या ठरली. रवींद्रने ब्रेकनंतर आक्रमक पवित्रा घेतला. शुभमनने बशीरच्या गोलंदाजीवर खणखणीत षटकार खेचले. शुभमनची खेळी १६२ चेंडूंत १३ चौकार व ८ षटकारांसह १६१ धावांवर संपुष्टात आली. त्यानंतर आलेला नितीश कुमार रेड्डी मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात १ धावांवर बाद झाला.
भारताने या कसोटीत दोन्ही डावांत मिळून १०१४ धावा केल्या आणि कसोटी क्रिकेटमधील ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी त्यांनी २००४ मध्ये सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९१६ धावांची सर्वोत्तम धावसंख्या उभारली होती. प्रथम श्रेणी क्रिकेटच्या २०० वर्षांच्या इतिहासात फक्त ९ संघांना ५०० हून अधिक धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करता आला आहे. त्यापैकी इंग्लंडच्या मैदानावर फक्त चार वेळा असे घडले आहे. भारताने ६ बाद ४२७ धावांवर डाव घोषित केला आणि इंग्लंडला विजयासाठी ६०८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. जडेजा ६९ धावांवर नाबाद राहिला.
प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या इंग्लंडची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर झॅक क्रॉली आपले खाते न उघडताच सिराजचा शिकार ठरला. त्यानंतर बेन डकेट आणि ओपी पोप यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र आकाशदीपच्या एका अप्रतिम चेंडूवर बेन डकेटचा त्रिफळा उडाला. त्याने २५ धावा केल्या. इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रुटकडून संघाला खूप अपेक्षा होत्या. मात्र आकाशदीपने त्याला ६ धावांवर त्रिफळाचीत केले. दिवसअखेर इंग्लंडने ३ बाद ७३ धावा केल्या असून पोप २४ आणि हॅरी ब्रूक १५ धावांवर नाबाद आहेत. भारतातर्फे आकशदीपने २ तर सिराजने १ बळी घेतला. भारताला विजयासाठी ७ गड्यांची आवश्यकता असून भारत इंग्लंडपेक्षा ५३६ धावांनी आघाडीवर आहे.

विश्वविक्रमाची संधी हुकली

या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना गिलने २६९ धावांची खेळी केली. पहिल्या डावात द्विशतकी खेळी केल्यानंतर त्याच्याकडे दुसऱ्या डावातही द्विशतकी खेळी करण्याची संधी होती. याआधी कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असे कधीच घडलेले नाही. जर गिलने अजून ३९ धावा केल्या असत्या, तर कसोटी क्रिकेटमधील दोन्ही डावात द्विशतके झळकावणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला असता. मात्र हा मोठा रेकॉर्ड थोडक्यात हुकला.

एकाच सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड हुकला
गिलकडे एकाच कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची संधी होती. शुभमन गिलने या डावात फलंदाजी करताना ४३० धावा केल्या. कसोटी क्रिकेटमधील एकाच डावात सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड हा ग्राहम गुच यांच्या नावावर आहे. ग्रामह गुच यांनी १९९० मध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर ४५६ धावा केल्या होत्या. आता गिल सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. गिलने आणखी २७ धावा केल्या असत्या तर हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला असता.

कसोटीत एकाच सामन्यात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
ग्राहम गूच विरुद्ध भारत, लॉर्ड्स, १९९०- ४५६ धावा
शुभमन गिल विरुद्ध इंग्लंड, बर्मिंगहॅम, २०२५- ४३० धावा
मार्क टेलर विरुद्ध पाकिस्तान, पेशावर, १९९८- ४२६ धावा
कुमार संगकारा विरुद्ध बांगलादेश, चटगांव, २०१४- ४२४ धावा

ब्रायन लारा विरुद्ध इंग्लंड, सेंट जॉन्स, २००४- ४०० धावा


भारताकडून एका कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा
१०१४ विरुद्ध इंग्लंड, बर्मिंगहॅम, २०२५
९१६ विरुद्ध ऑस्ट्रेलिया, सिडनी, २००३
९१० विरुद्ध पाकिस्तान, बेंगळुरू, २००७
८७५ विरुद्ध इंग्लंड, राजकोट, २०२४
८४८ विरुद्ध इंग्लंड, नॉटिंगहॅम, २०१४

दोन्ही डावांमध्ये शतके करणारे भारतीय कर्णधार
सुनील गावस्कर वि. वेस्ट इंडिज, १९७८
विराट कोहली वि. ऑस्ट्रेलिया, २०१४
शुभमन गिल वि. इंग्लंड, २०२५
संक्षिप्त धावफलक
भारत : पहिला डाव : ५८७, दुसरा डाव : ६ बाद ४२७ घोषित
इंग्लंड : पहिला डाव : ४०७, दुसरा डाव : ३ बाद ७२