करु संवर्धन मोसमी आरोग्यवर्धक खजिन्याचे

आदिम ते आधुनिक काळाच्या प्रवासात मानवाने खूप काही कमावले आणि खू्प सारे गमावलेही. आपल्या पुर्वजांना कदाचित पुस्तकी ज्ञान नव्हते परंतु शाश्वत विकासाचे विज्ञान त्यांना पूर्णपणे उमजले होते.

Story: साद निसर्गाची |
7 hours ago
करु संवर्धन मोसमी  आरोग्यवर्धक खजिन्याचे

पावसाळ्याला सुरुवात झाली की जंगलात शिरमंडोळी, टायकळा,‌ भूईफोड, कुड्डूक, पियू यांसारख्या मोसमी रानभाज्या, काजुचे अंकुर (घोडका), बांबूचे कोवळे कोंब (किल्ल), आकूर यासारखे पौष्टिक अंकुर, रताळे, सुरण, चिरका यासारख्या कंदमुळांच्या रुपात आरोग्यवर्धक खजिना उगवू लागतो. यामध्ये फायबर, व्हिटॅमिन बी, पोटॅशियम, तांबे यासारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो. आरोग्यासाठी उपयुक्त असा हा नैसर्गिक खजिना एकेकाळी जंगलात सहज मिळायचा. हा असा खजिना आहे ज्यासाठी मानवाला कोणतीही किंमत मोजावी लागत नाही. किंमत न मोजता मिळालेला खजिना हा खरंतर निसर्गाची देणगीच. पण म्हणतात ना जे‌ मोफत मिळते त्याला किंमत नसते. हा खजिना आज कमी कमी होत आहे त्यामागचे मुख्य कारणही हेच. 

आदिम ते आधुनिक काळाच्या प्रवासात मानवाने खूप काही कमावले आणि खू्प सारे गमावलेही. आपल्या पुर्वजांना कदाचित पुस्तकी ज्ञान नव्हते परंतु शाश्वत विकासाचे विज्ञान त्यांना पूर्णपणे उमजले होते. म्हणूनच तर निराकार, वारुळ, शिला-पाषाणं, देवराईच्या स्वरूपात ते वनराई, दगडांचे, मृतिकेचे संरक्षण करत असत. निसर्ग व निसर्गातील प्रत्येक घटकाचे संवर्धन व्हावे म्हणून काही अलिखित नियम आखण्यात आले होते ज्यांचे‌ पालनही ते तितक्याच काटेकोरपणे करत असत. 

आकूर हा पावसाळ्यात मिळणाऱ्या एका झुडपाचा अंकुर आहे. हा नदीकाठी उगवतो. तांबूस हिरव्या रंगाचा आकूर कोवळ्या अवस्थेतच खाल्ला जातो. आकुराचे तीख-आंबट तर गोव्यात खूप आवडीने खाल्ले जाते.

आषाढी एकादशीनंतर धो धो कोसळणारा पाऊस थोडा उसंत घेईल आणि उन-पावसाचा लपंडाव सुरू होईल. हे वातावरण अळंबीसाठी उपयुक्त. अळंबी ही एकप्रकारची बुरशी आहे जी आपण मोठ्या आवडीने खातो. माणूस मांसाहारी खाणारा असो किंवा शाकाहारी, दोघांनाही अळंबी आवडते. पूर्वीच्या काळी अळंबी खुटायला जाणारे लोक ती सरसकट न खुटता अळंबीचे छोटे कळे तसेच वारुळाला सोडून देत. हा पारंपरिक अलिखित नियम होता.‌ छोटे कळे खुटल्यास साप मागावर येईल असा गैरसमज होता. त्यामुळे लोक अळंबीचे छोटे कळे खुटायला घाबरत असत. आज आपण‌ जरी याला अंधश्रद्धा म्हणत असलो‌ तरी त्या काळातील अंधश्रद्धा/गैरसमज अळंबीच्या पुनरुज्जीवनासाठी महत्त्वाची ठरते असे. काही ठिकाणी अळंबी खुटून झाल्यानंतर ती जागा पानांच्या सहाय्याने झाकून ठेवली जात. हा सुद्धा एक अलिखित सांकेतिक नियमच होता. यामुळे आपोआप अळंबीचे पुनरुज्जीवन होणे शक्य होत असे. 

बांबूचा कोंब हा सुद्धा फक्त पावसाळ्यात उगवतो. गोव्यामध्ये हे कोंब विविध पदार्थांमध्ये वापरले जातात. याला किल्ल असेही म्हणतात. बांबूचे कोंब जमिनीखाली असलेल्या राइझोम नावाच्या भागातून वाढतात. बांबूच्या कोंबांची भाजी चविष्ट व पौष्टिक असते. यांचा उपयोग काही औषधांमध्येही केला जातो. 

रानभाज्यांमध्ये औषधी गुणधर्म असतात त्यामुळे त्या नेहमी कमी शिजवाव्यात. त्यामधील पोषणमूल्ये टिकवून ठेवण्यासाठी त्या जास्त शिजवणे टाळावे. या दगदग आणि धावपळीच्या युगात आपण आपल्या आहारामध्ये जास्तीतजास्त रानभाज्या समाविष्ट केल्या पाहिजेत. पण दुर्दैवाने, आजच्या बहुतांश मुलांना रानभाज्या, अंकुर, कंदमुळांची नावं सुद्धा माहीत नसतात. अळंबी खुटायला वनात जाणारी आजची पिढी विचारा अभावी अळंबीच्या लहान कळ्यादेखील खुटून आणतात. काही जण अळंबी मुळातून उपटून काढतात. त्यामुळे त्या प्रदेशातील ही प्रजाती नष्ट होते. एकेकाळी जी गोष्ट फुकट मिळायची, आज ती गोष्ट बाजारात विकत मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे आकूर, अळंबी, कोंब यासारख्या पौष्टिक खाद्याचे संवर्धन करणे अत्यंत गरजेचे आहे.


स्त्रिग्धरा नाईक
(लेखिका विद्युत अभियांत्रिकीच्या प्राध्यापिका आहेत.)