जीपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये इंग्रजीचे महत्त्व अनमोल आहे. हा विषय केवळ लेखी परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठीच नव्हे, तर मुलाखतीत प्रभावी संवाद साधण्यासाठीही अत्यंत महत्त्वाचा ठरतो. योग्य अभ्यासाने इंग्रजीवर प्रभुत्व मिळवून तुम्ही यशाचा मार्ग सुकर करू शकता.
गोवा लोकसेवा आयोग (GPSC) द्वारे घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा राज्यातील शासकीय पदभरतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. या परीक्षा अनेक टप्प्यांत घेतल्या जातात आणि त्यामध्ये विषयांची विविधता देखील मोठी असते. GPSC च्या सर्वच प्रमुख परीक्षांमध्ये इंग्रजी हा विषय महत्त्वाचा असतो. इंग्रजी विषयाचा अभ्यास केल्याशिवाय या स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवणे कठीण ठरू शकते.
इंग्रजी विषयाचा समावेश प्रामुख्याने व्याकरण, शब्दसंग्रह (vocabulary), निबंध लेखन, मुद्देसूद उत्तरे लिहिणे तसेच त्या अनुषंगाने विचारले जाणारे प्रश्न या स्वरूपात असतो. परीक्षेचा प्रारंभिक (Preliminary) टप्पा, जो पार्ट १ म्हणून ओळखला जातो, त्यामध्ये इंग्रजीसह न्यूमरीकल अॅबिलिटी (numerical ability) आणि अॅप्टिट्यूड (aptitude) या घटकांवर प्रश्न विचारले जातात.
उमेदवारांनी लक्षात ठेवले पाहिजे की इंग्रजी आणि अॅप्टिट्यूड या दोन्ही विषयांना मिळून किमान २५ गुण दिलेले असतात. काही परीक्षांमध्ये पार्ट १ साठी एकूण ४५ गुणांचे प्रश्न असतात, ज्यामध्ये इंग्रजीचा वाटा ठराविक प्रमाणात निश्चित असतो. या भागावर विशेष लक्ष दिले तर ‘कट-ऑफ’ गुण मर्यादेपेक्षा जास्त गुण मिळवणे सहज शक्य होते. त्यामुळे इंग्रजीसारखा विषय दुर्लक्षित करता कामा नये.
इंग्रजीवर चांगले प्रभुत्व मिळवणे केवळ लेखी परीक्षेसाठीच उपयुक्त नाही, तर मुलाखतीसाठी (इंटरव्ह्यू) देखील खूप महत्त्वाचे ठरते. मुलाखतीत प्रश्न विचारताना तुमची विचार मांडण्याची शैली, इंग्रजी शब्दसंपदा, संवाद कौशल्ये यांचा बारकाईने आढावा घेतला जातो. तुम्ही इंग्रजीतून स्पष्ट, मुद्देसूद आणि प्रभावी उत्तर देऊ शकत असाल तर परीक्षकांवर चांगला प्रभाव पडतो.
GPSC च्या परीक्षांचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्या दोन भागांत विभागलेल्या असतात – जनरल (सामान्य) विषय आणि कोअर (विशिष्ट) विषय. जनरल विषयात चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, भारतीय संविधान, अर्थव्यवस्था, इंग्रजी, तर्कशक्ती, अंकगणित अशा सर्वसाधारण बाबींचा समावेश असतो. कोअर विषय म्हणजे त्या विशिष्ट विभागाशी संबंधित विषय ज्या विभागातील पदासाठी परीक्षा घेतली जाते.
उदाहरणार्थ, जर आरटीओ (प्रादेशिक परिवहन कार्यालय) मध्ये पदे भरायची असतील तर परीक्षेत रस्ते सुरक्षा कायदे, वाहतूक नियम, आरटीओ कार्यालयीन कामकाज, रोड सेफ्टी, आरटीआय आदी विषयांवर प्रश्न येतात. याउलट, फिशरीज (मत्स्यव्यवसाय) विभागातील भरतीसाठी मासेमारीचे प्रकार, समुद्रशास्त्र, नद्यांचा अभ्यास, समुद्री जैवविविधता (बायोडायव्हर्सिटी), शिंपले, शेल फिश, बंदरे, कप्तान विभागातील कायदे व नियम या विषयावर प्रश्न असतात.
या परीक्षांमध्ये जनरल आणि कोअर विषय एकत्रितपणे साधारण ७५ गुणांचे बहुपर्यायी (MCQ) स्वरूपातील प्रश्न विचारले जातात. इंग्रजी या जनरल घटकाचा भाग असल्यामुळे त्याला पुरेसं महत्त्व देणे आवश्यक असतं. विशेषतः स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अनेक उमेदवारांचा इंग्रजी हा तुलनेने कमजोर विषय असतो. त्यामुळे इंग्रजीचा अभ्यास अधिक पद्धतशीर आणि सातत्यपूर्ण करणे गरजेचे आहे.
इंग्रजी विषयाची तयारी कशी करावी?
इंग्रजीत चांगले गुण मिळवण्यासाठी खालील गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे उपयुक्त ठरेल:
व्याकरणाचे नियम: 'टेन्सेस', 'अॅक्टिव्ह व्हॉइस' आणि 'पॅसिव्ह व्हॉइस' यांचा सखोल अभ्यास करा. वाक्यरचना अचूकपणे कशी करायची हे समजून घ्या. 'शाल (shall)' आणि 'शुड (should)', तसेच 'कॅन (can)' आणि 'कुड (could)' या शब्दांचा योग्य वापर अभ्यासा.
शब्दसंग्रह वाढवा: समानार्थी शब्द (Synonyms) आणि विरुद्धार्थी शब्द (Antonyms) यांचा नियमित सराव करा.
वाचनाची सवय: वर्तमानपत्रातील संपादकीय लेख, इंग्रजी पुस्तके वाचा. यामुळे तुमची भाषाशैली सुधारेल.
प्रश्न प्रकार समजून घ्या: 'फिल इन द गॅप' आणि वाक्याचे तुकडे योग्य क्रमाने लावणे यासारख्या प्रश्नांचा सराव करा.
निबंध लेखन: काही परीक्षांमध्ये निबंधावर प्रश्न विचारले जातात. सोपे सोपे निबंध लिहिण्याचा सराव करा.
वेळेचे नियोजन: परीक्षेमध्ये वेळेचे नियोजन खूप महत्त्वाचे असते. कॉम्प्रिहेन्शन (Comprehension) म्हणजेच निबंध व त्यावरील प्रश्न सोडवताना वेळेची बचत करण्यासाठी सुरुवातीला सोपे प्रश्न सोडवून घ्या. घड्याळ लावून सराव केल्यास वेळेचे योग्य नियोजन होते आणि एकाग्रता वाढते.
स्वतंत्र वही: इंग्रजीच्या अभ्यासासाठी एक स्वतंत्र वही करून त्यात महत्त्वाचे नियम, शब्द आणि वाक्यांचा सराव नियमितपणे करा. चॅट जीपीटी (Chat GPT) सारख्या साधनांचा उपयोग सराव करण्यासाठी करता येऊ शकतो, परंतु त्यावर पूर्णपणे अवलंबून राहू नका.
इंग्रजी या जनरल घटकाचा भाग असल्यामुळे त्याला पुरेसं महत्त्व देणे आवश्यक असतं. इंग्रजीवर प्रभुत्व मिळवल्यास तुमचे कट-ऑफ पार करण्याचे आणि अंतिम निवड होण्याचे स्वप्न नक्कीच साकार करता येईल.
अॅड. शैलेश कुलकर्णी, कुर्टी - फोंडा
(लेखक नामांकित वकील आणि
करिअर समुपदेशक आहेत.)